Gunaratna Sadavarte

सदावर्तेंची एसटी बँकेतील सत्ता जाणार.. मेव्हण्याचा लाड करणे भोवणार? Gunaratna Sadavarte

कोल्हापूर | राज्यातील वादग्रस्त वकील अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी एसटी बँकेच्या निवडणुकीत ज्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून मर्जितील कार्यकर्त्यांना संधी देवून निवडून आणले. तेच संचालक आता सदावर्तेंच्या विरोधात गेले आहेत. त्यामुळे सदावर्ते यांची एसटी बँकेतील सत्ता जाण्याची शक्यता असून 19 पैकी 14 संचालकांनी त्यांच्याविरोधात आघाडी उघडली आहे. सरकारनामाने याबाबत वृत्त दिले आहे.

सदावर्तेंच्या विरोधात गेलेले संचालक कालपासून (गुरुवार) संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहेत. समाजात तेढ निर्माण करणे, एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न करणे, विरोधी भूमिका घेणे या कारणामुळे एसटी बँकेचे 14 संचालक सदावर्ते यांच्या विरोधात गेल्याची माहिती आहे.

मेव्हण्याचे लाड करणे सदावर्तेंच्या अंगलट

एसटी बँकेत सत्ता मिळवल्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी आपल्या मेहुण्यास व्यवस्थापकीय संचालकपदावर बसवले. बँकिंग क्षेत्रातील कोणताही अनुभव नसताना इतक्या मोठ्या पदावर बसवल्यानंतर बँकेचे संचालक आणि सभासदांमध्ये सदावर्ते यांच्याबद्दल वातावरण तापले आहे. त्यामुळे मेव्हण्याचा लाड करण्याचा डाव सदावर्तेंच्या अंगलट आल्याचे बोलले जात आहे.

सहा महिन्यापूर्वी एसटी बँकेची निवडणूक झाली. या निवडणूकीची राज्यभरात चर्चा झाली. एसटी बँकेत एसटी कर्मचाऱ्यांच्या अधिकृत संघटनेला मात देऊन सदावर्ते यांनी आपले एकतर्फी पॅनेल विजय केले होते. यातील 19 पैकी 14 संचालक सदावर्ते यांच्या विरोधात गेल्याने सदावर्तेंची एसटी बँकेतील सत्ता संपुष्टात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

सदावर्ते हे समाजात द्वेष पसरवत आहेत. सामान्य गरीब एसटी कर्मचाऱ्यांचा केवळ राजकारणासाठी उपयोग करत आहेत. असा आरोप या चौदा संचालकांनी करत त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. काल झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीला या चौदा संचालकांनी अनुपस्थिती दाखवून हे सर्वजण संपर्क क्षेत्राच्या बाहेर गेले आहेत. केवळ पाच संचालक बैठकीला उपस्थित असल्याची माहिती आहे. उर्वरित 14 संचालक हे कोल्हापूर परिसरात असल्याची माहिती आहे. नॉट रिचेबल असलेले हे संचालक दोन दिवसात कोल्हापुरात पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे.

14 संचालकांच्या मागे कोल्हापूरचा सूत्रधार?

एसटी बँकेच्या निवडणुकीत उमेदवारीवरून कोल्हापूर विभागात संघर्ष निर्माण झाला होता. सदावर्ते यांचा कार्यकर्ता असणारा एका कर्मचाऱ्याला डावलून ऐनवेळी दुसऱ्या उमेदवाराला संधी दिली होती. त्याचा राग मनात धरून संबंधिताने या चौदा संचालकांच्या मागे ठाम राहण्याचा निर्णय घेतला आहे. या संचालकांच्या मागे कोल्हापूरचा सूत्रधार असल्याची चर्चा एसटी कर्मचाऱ्यांमध्ये आहे.

Scroll to Top