बारावीनंतर करिअरचे नवे मार्ग! जाणून घ्या विविध शाखेतील करिअरच्या संधी | Career After 12th

मुंबई | बारावीनंतर वेगळ्या वाटेने जाऊ इच्छिणाऱ्या कोणत्याही शाखेतील विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या करिअर संधी (Career After 12th) सध्याच्या काळात सुलभतेने मिळू शकतात. अमूक एखादा अभ्यासक्रम वा संस्थेमध्ये प्रवेश मिळाला नाही म्हणून निराश होण्याचे कारण नाही. आपल्या काही अंगभूत क्षमता, आवड, गती, बलस्थाने लक्षात घेऊन असे अभ्यासक्रम केले व त्यात प्रावीण्य मिळवल्यास यशाच्या पायऱ्या चढणे सोपे जाऊ शकते.अशाच काही करिअरच्या संधी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

मानसोपचार तज्ञ:-
मानसिक आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे गेल्या काही वर्षांपासून सातत्याने सांगितले जाते. आपणास मानसिक आजार राहू शकतो, याविषयी खुलेपणाने बोलणाऱ्या आणि या आजाराला दूर करण्यासाठी तज्ज्ञांकडे जाणाऱ्या नागरिकांची संख्या हळूहळू का होईना वाढत चाल्याचे दिसून येते.

वेडिंग प्लॅनर:-
सुबक–सुंदर अशा पध्दतीने लग्नसमारंभ साजरा करण्याकडे कल वाढलेला आहे. त्यासाठी चांगला खर्च केला जातो. हा सोहळा संस्मरणीय व्हावा, काही काळ आपली वाहवा होत रहावी, हा सुप्त हेतूही असतो. वेडिंग प्लॅनरमार्फत असे सोहळे आयोजित केले जातात. त्यामुळे या क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढलेल्या आहेत. इव्हेंट मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम केलेले उमेदवार या क्षेत्रात करिअर घडवू शकतात. तुम्ही केलेले उत्कृष्ट काम तुम्हाला पुढील संधी मिळवून देतात.

सायबर सिक्युरिटी:-
डिजिटल व्यवहार ज्या गतिने वाढताहेत त्याच गतिने सायबर गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ती थांबवणे शक्य नसले तरी अशा गुन्ह्यांना थोपवणे, या गुन्ह्यांचा पाठलाग करणे, डिजिटल व्यवस्था सुरक्षित करणे यासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञांची मोठी गरज भासेल. या विषयातील पदवी-पदव्युत्तर अभ्यासक्रम भविष्यात उत्तमोत्तम संधी मिळवून देऊ शकतात.

ज्वेलरी डिझाईन:-
दागिन्यांच्या विविध नावीन्यपूर्ण डिझाइन्सची मागणी सातत्याने वाढत आहे. त्यामुळे या क्षेत्रातील प्रशिक्षण घेऊन काही वर्षे उमेदवारी केल्यावर उत्तमोत्तम करिअर संधी मिळू शकतात.

गुंतवणूक व्यवस्थापन:-
या क्षेत्राविषयी जाणीवजागृती करण्यासाठी बरीच वृत्तपत्रे आणि इतर माध्यमांनी गेल्या काही वर्षात मोठी भूमिका बजावली आहे. त्यामुळे नागरिकांची मानसिकता, बचत ते गुंतवणूक ते संपत्ती निर्मिती अशी बदलत चालण्याचे शुभसंकेत मिळू लागले आहेत. त्यामुळे या क्षेत्रात भविष्यात चांगल्या संधी मिळू शकतात.

टॉय डिझाईन:-
सर्व जगात खेळण्यांचे मार्केट मोठे आहे. मात्र या क्षेत्रात चिनने लक्षणीय आघाडी घेतली आहे. भारतातसुध्दा चीनमध्ये तयार झालेली खेळणी प्रचंड प्रमाणात विकली जातात. या क्षेत्रात निर्यातीची मोठी संधी आणि भारतातील कुशल कारागिरी लक्षात घेता आपला देश या क्षेत्रात जगामध्ये आघाडीवर जावा यासाठी आपले पंतप्रधान आग्रही आहेत. त्यासाठी भारत सरकारमार्फत काही योजना आणि सवलतीही दिल्या जातात. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन, गांधीनगर, या संस्थेत एम. डिझाइन इन टॉय ॲण्ड गेम डिझाइन, हा अडीच वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम चालवला जातो. प्रॉडक्ट डिझाईन हा अभ्यासक्रम करणारे विद्यार्थीसुध्दा या क्षेत्राकडे वळू शकतात.