Govind Pansare : मोठी बातमी – गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

मुंबई | कॉम्रेड गोविंद पानसरे (Govind Pansare) हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आलाय. न्यायमूर्ती ए. एस. किल्लोर यांच्या एकलपीठाकडून हा निर्णय देण्यात आलाय.

कोण आहेत आरोपी?

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोपी सचिन अंदुरे, गणेश मिस्कीन, अमित देगवेकर, भरत कुरणे, अमित बड्डी आणि वासुदेव सूर्यवंशी या सहाआरोपींना 2018 ते 2019 दरम्यान अटक करण्यात आली होती. ते गेल्या सहा-सात वर्षांपासून तुरुंगात होते.

जामीन मंजुरीचे कारण

या प्रकरणाचा खटला लवकर निकाली लागण्याची शक्यता नाही आणि तपासात विशेष प्रगती झालेली नाही, असे नमूद करत न्यायालयाने आरोपींना जामीन देण्याचा निर्णय घेतला. तपास यंत्रणांकडून समाधानकारक पुरावे सादर न झाल्याने आरोपी जामीनसाठी पात्र ठरत असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

हत्या आणि तपासाचा प्रवास

गोविंद पानसरे यांची 16 फेब्रुवारी 2015 रोजी कोल्हापुरातील त्यांच्या राहत्या घरासमोर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास दीर्घकाळ सुरु असून, सुरुवातीला महाराष्ट्र पोलिसांकडून आणि नंतर सीआयडीकडून तो पुढे नेण्यात आला.

पानसरे हत्या प्रकरणाचा तपास गौरी लंकेश हत्या प्रकरणाशी जोडला गेला. गौरी लंकेश हत्येतील आरोपींना अटक झाल्यानंतरच पानसरे हत्या प्रकरणातील संशयितांच्या हालचाली उघड झाल्या. मात्र, अद्याप या प्रकरणातील मुख्य सूत्रधार फरार आहेत.

मेघा पानसरे यांची प्रतिक्रिया

गोविंद पानसरे यांच्या सून मेघा पानसरे यांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. त्या म्हणाल्या, “माननीय न्यायालयाने दिलेला निर्णय सुप्रीम कोर्टाच्या आधीच्या निकालावर आधारित आहे. आम्ही जजमेंट पाहिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात जायचे की नाही, याचा निर्णय घेऊ. मुख्य आरोपी अद्याप फरार असून तपास यंत्रणांना यश आलेले नाही. त्यामुळे हा खटला लवकर निकाली लागावा, यासाठी आम्ही प्रयत्न सुरू ठेवू.”

पानसरे हत्या प्रकरणात गेल्या काही वर्षांत अनेक घडामोडी घडल्या असल्या, तरी अजूनही न्याय मिळण्याची वाट पाहावी लागणार आहे.