मोठी बातमी | गोविंदराव पानसरे हत्येप्रकरणी समीर गायकवाड, वीरेंद्रसिंह तावडेसह 10 जणांवर दोष निश्चित | Govindrao Pansare

कोल्हापूर | ज्येष्ठ कामगार नेते गोविंदराव पानसरे (Govindrao Pansare) यांच्या हत्या प्रकरणातील 10 आरोपींवर दोष निश्चिती करण्यात आली आहे. कोल्हापूरचे जिल्हा न्यायाधीश एस. एस. तांबे यांच्या न्यायालयासमोर आज (सोमवारी) ही सुनावणी झाली. पुढील सुनावणी 23 जानेवारी रोजी होणार आहे.

ज्येष्ठ कामगार नेते कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांची हत्या झाल्यानंतर 12 संशयितांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यातील 10 आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. तर यातील दोघे आरोपी फरार आहेत. त्यामध्ये विनय पवार व सारंग अकोलकर यांचा समावेश आहे.

या प्रकरणातील समीर गायकवाड व वीरेंद्रसिंह तावडे यांच्यासह दहा संशयित आरोपीवर आज दोष निश्चिती करण्यात आली. मोठ्या पोलीस बंदोबस्तात त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. यातील सहा संशयित बंगळुरू कारागृहात तर तीन येरवडा कारागृहात आहेत. विशेष सरकारी वकील म्हणून शिवाजीराव राणे हे काम पाहत आहेत. दोष निश्चिती झाल्यामुळे आता सुनावणीला वेग येण्याची शक्यता आहे. गोविंद पानसरे यांची 2015 मध्ये हत्या करण्यात आली होती.