News

\’या\’ माणसांमुळे समाजात अजून चांगुलपणा शिल्लक आहे..!

थोडी उशीराच झोप लागली होती, पण झोपेत (जागेपणी पडतात ती वेगळी) अनेक स्वप्न पडत होती. जी स्वप्न मनाला अस्वस्थ करणारी होती. त्यामुळे उठून डोळे चोळत घड्याळाकडे बघितले तर अडीच वाजले होते. अडीच पासून साडेतीन पर्यंत परत झोपण्याचा प्रयत्न केला, पण झोप लागेना. कारण झोपेत जी स्वप्न पडत होती तेच विचार डोक्यात सतत येते होते.

आज पुन्हा एकदा एकावर अन्यायकारी घटना घडली होती. तोच विचार मनात येत होता. त्यामुळे झोप लवकर लागत नव्हती. मी ज्या-ज्या वेळी अस्वस्थ होतो, त्यावेळी माझ्यातली अस्वस्थता लिखाणातून व्यक्त केल्याशिवाय मला आतून रित होता येत नाही. हा माझा मानसिक दोष आहे की, अजून काय हे मला माहीत नाही.

ज्या घटनेमुळे अस्वस्थपणा आला आहे… खोटे मुखवटे, सभ्येतचे बुरखे अशा या व्यवस्थेला उघडं करावे वाटत होते. यातील एक वाक्य जे कालच फेसबुकवर टाकले होते ते म्हणजे \’व्यवस्था ही नैतिकता आणि तत्व सोडलेल्या मुखवट्यांची रखेल असते.\’ हे लिहिले होते‌. पण शेवटी मन म्हणालं, अशा खोट्या मुखवट्यांच्या गोष्टी लिहून त्यांना मोठे करण्यापेक्षा समाजात अजूनही बरंच काही चांगल घडत आहे. अशा गोष्टीचे लिखाण करून समाजातील चांगुलपणा वाढवावा आणि आपलं मनही रित करावं म्हणून हा शब्द प्रपंच…

नोकरीतून अन्न, वस्त्र, निवारा या किमान गोष्टी पूर्ण होता होत्या. त्यामुळे राहिलेला वेळ हा वाचनकट्टा संस्थेसाठी खर्च करु लागलो. पण आता नोकरी नसल्यामुळे स्थिर उत्पन्न नसल्याने वाचनकट्टा संस्थेचे व प्रकाशन व्यवसाय वाढवावा विचार करून दोनवर्ष पाठीमागे राजारामपुरीत दोन रुम भाडेतत्त्वावर घेतल्या. या रुमचे मालक श्री.आंगडी साहेब हे अत्यंत संवेदनशील स्वभावाचे, त्यांनी मला जमत असलेल्या भाड्याला होकार दिला. कधीकधी भाडे मागे पुढे व्हायचे पण त्यांनी कोणताच तगादा लावला नाही. कशीतरी दोन वर्षे पूर्ण केली. पण असा एक दिवस आला की आपण आता भाडे भरू शकत नाही. सगळ बंद करावे काही दिवस सगळ्या गोष्टींपासून शांत राहाव असं वाटू लागलं. त्यानुसार बंद करण्याचा निर्णय घेतला.

नवीन छापलेल्या पुस्तकांचे गट्टे, काही देणगीतून आलेली पुस्तके, काही माझी पुस्तके त्यांच्याकडे पाहून मला अस्वस्थ व्हायला लागलं. आता ती पॅक केल्याशिवाय पर्याय नाही. पॅक करून घरी नेऊन ठेवायचे, घर सुद्धा भाड्याचे परत मालकांनी कधी घर बदलायला सांगितले तर ही पुस्तके पुन्हा कुठे घेऊन जायची, असे अनेक विचार मनात येत होते. कधीकाळी हातात एक दोन पुस्तक असताना आम्ही शाळा-कॉलेजवर जाऊन तिथल्या ग्रंथालयाचा आधार घेऊन मुलांच्यात वाचन गोडी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आज आमचेकडे हजारो पुस्तके आहेत याचा आम्हाला आनंद आहे. पुस्तक प्रदर्शनात विक्रीस पुस्तके ठेवताना आमच्याकडे चार पेक्षा जास्त पुस्तकं नव्हती, आज चाळीसहून अधिक पुस्तके आमच्याकडे आहेत. या प्रत्येक पुस्तकांशी आमच एक नात तयार झाले आहे‌. ही पुस्तके गेली अकरा वर्षे समाजाच्या उन्नतीसाठी ऊन-वारा सहन करत आमच्याबरोबर फिरतात. पुस्तके वस्तुरूपी निर्जीव जाणवत असली तरी त्यांच्या कृतीने ती संवेदनशील, प्रामाणिक या सजीव वृत्तीचीच आहेत. याची प्रचिती आम्हाला वारंवार येते. त्यामुळे या पुस्तकांशी आमचे एक वेगळे नाते निर्माण झालेले आहे.

अशी ही पुस्तके पॅक करून कुठे ठेवायची, कशी ठेवायची, पावसातून कशी घेऊन जायचीत असे अनेक प्रश्न होते. यासाठी एखादी छोटी रूम शहरातच बघून तिथे काही दिवस ठेवावीत हा विचार करून सोशल मीडियावरती मेसेज टाकला. याला आमचे मित्र श्री. सचिन बागल साहेब, मैत्रीण सौ. राधिका चापेगावकर व सदैव आमच्या पाठीशी असणारे डॉ. शशीकांत पाटील सर, श्री. दिपक शिंदे, सौ. शुभांगी भगत यांनी रुम देण्याची भावना व्यक्त केली. यामुळे मनाला एक आधार वाटला. संस्थेचे विश्वस्त श्री. सुनील मोरे हे सुद्धा खूप अस्वस्थ झाले होते म्हणाले, \’राजे पुस्तके घरी घेऊन जायला नको, एखादी चांगली रूम मिळते का बघतो म्हणून त्यांनी सुद्धा एक रुम शोधली होती. पण रूममध्ये पुस्तकं ठेऊन किंवा कुठेतरी लांब ठिकाणी पुस्तकाचे बंद गोडाऊन करणे हे मनाला पटेना. शेवटी ३१ जूलैला पुस्तक घरी ठेवायची निर्णय घेतला. त्यानुसार रूम मालकांना फोन करून सांगितले. साहेब महिनाभर अगोदर रुम सोडू त्यामुळे डिपॉझिटमधील रक्कम परत कराल का? त्यांनी क्षणात होकार दिला आणि एक महिन्याचे भाडे किमान वाचवावे या भावनेतून पॅकिंग करायला सुरुवात केली.

ठरल्याप्रमाणे सगळं पॅकिंग झालं होतं. टेम्पो साठी एका मित्राला फोन केला, पुस्तके घरी घेऊन जायची आहेत त्यांनी लगेच म्हटले की, \’त्यात काय कधी ते सांगा, घरी टाकून येऊयात की,\’ टाकूयात हा शब्द ऐकल्यानंतर पोटात गोळा आला, मी त्यांना म्हटलं दादा टाकूयात म्हणू नका \’ती माझी लेकरं आहेत हो.\’ याच दिवशी आमचे मित्र लेखक श्री. विजय पाटील हे भेटले. बोलता बोलता ते म्हणाले, आमच्या शाहू स्टेडीयममध्ये काही गाळे रिकामे आहेत. त्यासाठी पारस ओसवाल साहेबांना एकदा विनंती करून बघा, अशा सामाजिक उपक्रमांना मदत करण्यासाठी ते सदैव पुढे असतात.\’

आदरणीय पारस ओसवाल साहेबांची थोडीबहुत पूर्व ओळख असल्यामुळे मी त्यांना तिथूनच लगेच फोन केला. सर्व वस्तुस्थिती समजून सांगितली. मी त्यांना म्हणालो \’साहेब काही पुस्तक आहेत ती ठेवण्यासाठी फक्त गाळा पाहिजे, कधी वाचकांना पुस्तक लागले तर तेथून देता येईल किंवा आठवड्यातून एकादा दिवस सुरू ठेवता येईल.\’ यावर ते म्हणाले, असे आठवड्यातील एखादा दिवस का विचार करता आपण ते काम वाढवू, मी तुम्हाला चार वाजता फोन करतो आपण भेटू…

बरोबर सव्वा चार वाजता त्यांचा मला फोन आला आणि त्यांनी मला शाहू स्टेडियमला बोलवले, त्यांनी प्रत्यक्ष गाळा दाखवला आणि सांगितले हा गाळा तुम्हाला घ्या, सध्या एक वर्षभर वापरा, पुढे बघू, कोणतेही भाडे-डिपॉझिट देऊ नका. हे ऐकून काही क्षण मला काही सूचेना. कारण एकीकडे दारातील सार्वजनिक रस्त्यावर गाडी लावायला न देणारी माणसं तर दुसरीकडे शहरातील मुख्य ठिकाणी आपला गाळा तेही माझा तसा संपूर्ण परिचय नसताना सुद्धा फार विचार न करता गाळा ताब्यात पण दिला. निरपेक्ष भावनेतून विलंब न लावता गाळा ताब्यात देणे ही ओसवाल साहेबांची कृती म्हणजे खोटे मुखवटे घेऊन फिरणाऱ्यांच्या कृतीच्या कैकपटीने पुढे खऱ्या अर्थाने चांगूलपणा वृध्दींगत करणारी कृती वाटते.

मागील आठवड्यापासून पुणे येथील बूकस्पेस लायब्ररी बंद होत आहे. हा मेसेज वाचला थोडं वाईट वाटलं पण त्याच क्षणाला शिवाजी विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागातून निवृत्त झालेले आदरणीय प्रा. आर. बी. पाटील सर यांनी एका वृत्तसमूहाच्या जुलै २०२४ च्या मासिकामध्ये नुकताच प्रसिद्ध झालेला \’ग्रंथवेडा\’ पै यांचा लेख पाठवला. त्या लेखाचा मथळा असा होता…

ग्रंथपाल, ग्रंथलेखक, ग्रंथविक्रेता, ग्रंथप्रसारक, ग्रंथप्रकाशक असे ग्रंथ व्यवसायाशी संबंधित अनेक व्यवसाय पर्यायी शब्द आपण नेहमीच वाचत- ऐकत असतो. यातल्या प्रत्येक शब्दाकडे किंवा व्यवसायाकडे चरितार्थाचं साधन म्हणून पाहणारे अनेक जण आपण पाहतो, परंतु चरितार्थाचं सोडा, पदराला खार लावून ग्रंथ व्यवसाय करणारी, ग्रंथव्यवहार संस्कृती गावोगावी रुजावी यासाठी प्रयत्न करणारी आणि वाचनसंस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी जिवाचा आटापिटा करणारी व्यक्ती अपवादानं दिसते. माझ्या पाहण्यात आलेली अशी व्यक्ती म्हणजेच डोंबिवलीच्या पै फ्रेंड्स लायब्ररीचे पुंडलिक पै. त्यांच्या लायब्ररीचं यंदा ३८वं वर्ष. कोटींची उलाढाल.

हा लेख वाचून पुन्हा सकारात्मक झालो. या देशात महापुरुषांनी व संतांनी आपलं घरदार सोडून सामाजिक उन्नतीसाठी आपले आयुष्य खर्च केले. अर्थात त्यांच्या कार्यापुढे आमची त्यांच्या पायाच्या नकाएवढी सुद्धा पात्रता नाही. त्यामुळे वाचनसंस्कृती आणि मराठी भाषा संवर्धन आमच्या आयुष्यातून बाजूला गेले तर मी किती काळ जगू शकेन माहित नाही. थोर संगणकतज्ज्ञ स्टीव्ह जॉब्स आयुष्याच्या अखेरला म्हणतो, आज माझ्याकडे करोडो प्रॉपर्टी आहे, सर्व काही आहे; पण, मी जे आजारपण भोगत आहे ते आजारपण भोगण्यासाठी मी नोकर नेमू शकत नाही. पण मी आरोग्याची पुस्तके वाचू शकलो असतो तर जे आज भोगत आहे जगत आहे ते कदाचित पुढे गेले असते.\’

शेवटी मला हेच सांगायचं आहे की, समाजात अजून चांगुलपणा शिल्लक आहे. आपला हेतू, आपले काम प्रामाणिक असले की ही सृष्टी सर्व काही तुम्हाला उपलब्ध करून देते. त्यामुळेच मला आदरणीय पारस ओसवाल साहेब भेटले आणि माझा प्रश्न सुटला. हीच सकारात्मक बाब लक्षात घेऊन समाजातील चांगुलपणा वृद्धिंगत करायचा आहे.

संस्थेचे पेट्रन आदरणीय संजय ज्ञानदेव पवार व मार्गदर्शक आदरणीय प्रा. चंद्रकुमार नलगे सर, डॉ. बी. एम. हिर्डेकर सर, आदरणीय प्रा. विनय पाटील सर, आदरणीय टि. के. सरगर सर, आदरणीय प्राचार्य रेखा निर्मळे मॅडम, आदरणीय डॉ. सरोज बीडकर, आदरणीय युवराज पाटील साहेब, बंधुमित्र श्री. संतोष वडेर, श्री. दिपक परिट यांच्या साथीने आता पुन्हा एकदा नव्या जोमाने वाचन चळवळ वाढवायची आहे. सोबतच काही व्यवसायिक उपक्रम सुध्दा हाती घ्यायचे आहेत.

ही चळवळ चालवत असताना समाजाच्या हातभाराशिवाय पुढे जाणार नाही याची मला कल्पना आहे. थोर महापुरुषांनी सुद्धा समाजाच्या कल्याणासाठी आपली झोळी समाजापुढे धरली होती. त्यामुळे याच समाजाकडे सामाजिक गोष्टीसाठी झोळी पुढे धरायला लाजायचे काही या मतावर आता येऊन पोहचलो आहे‌. वाचनचळवळ अखंडपणे चालली पाहिजे. आपण असो अथवा नसो ही वाचन चळवळच आजच्या गजबजलेल्या सामाजिक अवस्थेतून प्रत्येकाला बाहेर काढेल. कोणी कितीही म्हणूदे पण वाचनसंस्कृती कमी झालेली नाही, किंबहुना ती वाढलेली आहे. फक्त तिची पद्धत बदलली आहे. तसचं समाजात सारचं काही बिघडलंय असंही नाही. आदरणीय पारस ओसवाल साहेबांसारखी व्यक्तिमत्व समाजात आहेत, त्यांच्या दातृत्वाला आमचा सलाम… अशी माणसं समाजात वाढण्यासाठी, सामाजिक समतोल आणि आनंदी समाज निर्मितीसाठी चला तर मग चांगूलपणा पेरुयात..!

  • युवराज सतबा कदम
    संस्थापक अध्यक्ष
    वाचनकट्टा बहुउद्देशीय संस्था, कोल्हापूर

    मोबा. 8975292626

(या संस्थेच्या कार्यात सहभागी होण्यासाठी आपण सुद्धा मदत करू शकता. मदत करायची असल्यास वरील मोबाईल क्रमांकावर फक्त Bank Details असा मेसेज पाठवा. क्यु आर कोडसह सर्व माहिती पाठवली जाईल.)

टीप- नुकताच संस्थेला सेक्शन 80G अंतर्गत कर सवलतीचे प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. त्यामुळे संस्थेला दिलेली देणगी सेक्शन 80G अंतर्गत कर सवलतीस पात्र आहे.

Back to top button