गोकुळ कडून दूध उत्पादकांना नवीन वर्षाची भेट… म्हैस दूध खरेदी दरात वाढ | Gokul Milk
कोल्हापूर | कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) संघाशी संलग्न म्हैस दूध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी दूध खरेदी दरामध्ये वाढ केली आहे. ही दरवाढ दि. ११ जानेवारी २०२५ पासून लागू होणार असून, ६.५ फॅट व ९.० एस.एन.एफ.च्या म्हैस दूधासाठी प्रतिलिटर २ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
गोकुळच्या संचालक मंडळाच्या दि. १० जानेवारी २०२५ रोजी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, “गोकुळने नेहमीच दूध उत्पादकांच्या हिताचा विचार केला आहे. सध्याच्या वाढत्या उत्पादन खर्चाच्या पार्श्वभूमीवर केलेली ही दरवाढ दूध उत्पादकांसाठी नक्कीच लाभदायक ठरेल. यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होईल.”
नवीन दरपत्रकानुसार, ६.५ फॅट व ९.० एस.एन.एफ. प्रतिलिटर दूध खरेदी दर ५२.८० रुपयांवरून ५४.८० रुपये केला आहे, तर ७.० फॅट व ९.० एस.एन.एफ.चे दर ५५.५० रुपयांवरून ५७.५० रुपये करण्यात आले आहेत.
संघामार्फत प्राथमिक दूध संस्थांना सुधारित दरपत्रक पाठवण्यात येणार असून, नवीन दर ११ जानेवारीपासून लागू होतील. गोकुळ परिवाराच्या वतीने दूध उत्पादक, संस्था, वितरक, वाहतूकदार व ग्राहक यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
म्हैस दूध खरेदी दरवाढीचे सुधारित दरपत्रक (दि. ११ जानेवारी २०२५ पासून लागू)
फॅट | एस.एन.एफ. | मागील दर (₹/लिटर) | नवीन दर (₹/लिटर) | वाढ (₹) |
---|---|---|---|---|
६.५ | ९.० | ५२.८० | ५४.८० | २.०० |
७.० | ९.० | ५५.५० | ५७.५० | २.०० |