बच्चे सावर्डे येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार तर राधानगरी तालुक्यातील मिसाळवाडी जवळ बिबट्याचं दर्शन, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
कोल्हापूर (प्रतिनिधी) | बच्चे सावर्डे येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार झाल्याची घटना घडली आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बच्चे सावर्डे गावातील खडी विभागात सावर्डे–कांदे रोड जवळ बापुसो आनंदराव बच्चे यांच्या शेतात हा प्रकार घडला आहे.
याठिकाणी सातवे येथील बिरू लखू आंब्रे यांच्या शेळ्यांचा कळप चरण्यासाठी आला होता. पहाटे 4 वाजता अचानक बिबट्याने हल्ला करत एका शेळीला ठार केले. शेळीला घेऊन जात असताना आंब्रे यांनी आरडाओरड केल्याने बिबट्याने शेळीला तिथेच टाकून ऊसात पळ काढला.
राधानगरी | मंगळवारी सायंकाळच्या सुमारास राऊतवाडी धबधब्याजवळील मिसाळवाडी गावानजीक राधानगरी इथल्या काही तरुणांना बिबट्या दिसला. दिग्विजय चौगले या तरुणानं आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात याचं चित्रण केल आहे. बिबट्या गावात आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच बच्चे सावर्डेचे पोलीस पाटील सागर यादव यांनी घटनास्थळी पाहणी केली आणि वन विभाग पन्हाळा यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. परीक्षेत्र वनाधिकारी अनिल मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ वनाधिकारी सागर पटकारे, नियतक्षेत्र अधिकारी संदिप पाटील, सचिन जाधव यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. घटनास्थळी बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले आहेत.
सतर्कतेच्या सूचना
वन विभागाने ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. शेतात जाताना एकटे जाऊ नये, सोबत बॅटरी व काठी ठेवावी, तसेच योग्य ती खबरदारी घ्यावी, असे सांगितले आहे. सावर्डे गावात यापूर्वीही बिबट्याने अनेक वेळा हल्ले करून पाळीव श्वान, शेळ्या आणि मेंढ्या ठार केल्या आहेत, त्यामुळे गावात भीतीचे वातावरण आहे.
नुकसान भरपाई आणि बिबट्याच्या बंदोबस्ताची मागणी
यापूर्वी घडलेल्या घटनांमध्ये वन विभागाने तात्काळ पंचनामा करून शासनास प्रस्ताव दाखल केल्यामुळे नुकसानग्रस्त मेंढपाळांना आर्थिक भरपाई मिळाली आहे. मात्र, ग्रामस्थांनी बिबट्याला सापळा लावून पकडून कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. नागरीकांनी सतर्क राहावे, असे आवाहन पोलीस पाटील सागर यादव यांनी केले आहे.