News

इचलकरंजीत ‘जर्मनी गँग’ची नादाला लागाल तर जिवंत न सोडण्याची नागरिकांना धमकी, अनेक वाहनांची तोडफोड

इचलकरंजी | शहरात पोलीस प्रशासनाचा धाक उरला नसल्याची बाब पुन्हा एकदा अधोरेखित झाली असून जर्मनी गँगचे कारनामे थांबलेले नाहीत. सरस्वती हायस्कूलजवळील भोने माळ परिसरात बुधवारी रात्री जर्मनी गँगमधील पाच जणांनी नशेत हातात दारूच्या बाटल्या आणि यंत्रमागाचे मारे घेत रस्त्यावर दहशत माजवली.

यावेळी जर्मनी गँगने ‘आज आमच्या नादाला कोण लागले, तर आम्ही त्याला जिवंत सोडणार नाही,’ अशी धमकी देत रस्त्यावरून ये -जा करणाऱ्यांना अडवून लूटमार केली. तसेच त्यांनी दिसेल त्या वाहनांचीही तोडफोड केल्याने भागातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण तयार झाले होते.

या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी धाडस दाखवून दोघांना पकडून त्यांची चांगलीच धुलाई केली. त्यानंतर त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले. मोठमोठ्याने आरडाओरडा करत मारहाणीसह दहशत माजवून दरोडा घातल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल झाला.

यापैकी रोहित प्रकाश मांडे (वय २१, रा. भोने माळ), आशादुल्ला हारुण जमादार (वय २६, भोने माळ), अक्षय श्रीकांत बेळगावे (वय २६), अक्षय अशोक घाडगे (वय २२, दोघे रा. लिगाडे मळा) या चार जणांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना २१ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

पसार झालेल्या विवेक ऊर्फ श्री विश्वास लोखंडे (रा. स्वामी मळा) याला काल रात्री उशिरा अटक केली आहे. त्यांनी केलेल्या तोडफोडीसह मारहाणीत रवींद्र रामचंद्र भांडे (रा. यशवंत कॉलनी), उत्तम प्रकाश वडे (रा. सरस्वती हायस्कूलजवळ), युवराज गजानन सातपुते (रा. भोने माळ), श्रीमती विद्या सुतार यांच्यासह पाचजण जखमी झाले आहेत.

यावेळी आरडाओरड करत या जर्मनी गँगने एकूण चार वाहनांची तोडफोड केली. याबाबतची फिर्याद महादेव बबन साळी (वय ४६) यांनी पोलिसांत दिली आहे. अटकेतील चार जण रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्यांच्यावर शहापूर, शिवाजीनगर, गावभाग पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत.

Back to top button