अखेर गौतमी पाटीलचा लावणी कार्यक्रम पहिल्यांदाच रद्द; गावकऱ्यांनीच कार्यक्रम रद्द करायला भाग पाडलं! Gautami Patil

इंदापूर | आपल्या दिलखेचक नृत्यामुळे तरुणांना भुरळ घालणारी लावणी नृत्यांगना गौतमी पाटील हिचा इंदापूर तालुक्यातील कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांवर बंदी घालावी, अशी मागणी जोर धरत असताना हा रद्द झालेला कार्यक्रम आता चर्चेचा विषय ठरत आहे.

इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी या गावात गणेश जयंतीनिमित्त गौतमी पाटीलच्या लावणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र यापूर्वीच्या तिच्या कार्यक्रमांची पार्श्वभूमी पाहता गावकऱ्यांंनी कार्यक्रमासाठी जागा देण्यास नकार दिला. या कार्यक्रमाची तिला सुपारी मिळाली होती अखेर, सुरक्षेच्या कारणास्तव गौतमीचा कार्यक्रम रद्द झाला आहे. यापूर्वीदेखील बारामतीत निरा वागसमध्ये कार्यक्रम झाला होता. त्यावेळी देखील गोंधळ झाला होता. 

गौतमीच्या लावणी कार्यक्रमांवर बंदीची मागणी
मागील काही दिवसांपासून गौतमी पाटील इंस्टाग्रामवर सक्रिय आहे. गौतमी पाटीलच्या लावणीचे अनेक चाहते आहेत. मात्र गौतमीच्या डान्सवर तातडीनं बंदी घालण्यात यावी अशी मागणी सोशल मीडियावर जोर धऱत आहे. तिच्या नृत्यातून अश्लिलता दिसते, असा आरोप सातत्याने लावणीप्रेमी आणि लावणी कलाकार करत आहेत. लावणीप्रेमींनी एकत्र येत काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत आरोप केले होते. तसेच तिच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्याचीही मागणी केली होती. 

बेडग येथील कार्यक्रमात राडा
सांगलीतील बेडग इथल्या एका मंडळाच्या वतीने वेगवेगळ्या क्षेत्रात उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या आणि बेडग गावचे नाव देशात गाजवणार्‍या मानकऱ्यांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर सोशल मीडिया स्टार गौतमी पाटील हिच्या नृत्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. नृत्याचा कार्यक्रम सुरु झाला. तिचं नृत्य पाहण्यासाठी जिल्ह्यातून आणि बाहेरुन तिचे चाहते आले होते. यावेळी झालेल्या राड्यात एका वृद्धाचा मृत्यू झाला होता तर अनेक जण जखमीही झाले होते.