गांधीनगरात धाडसी चोरी; 21 तोळे दागिन्यांसह रोकड लंपास | Gandhinagar theft
कोल्हापूर | गांधीनगर येथील कोयना कॉलनीत धाडसी चोरीचा (Gandhinagar theft) प्रकार उघडकीस आलाय. शकुंतला हिंदुजा यांच्या घराच्या दरवाज्याचा कडीकोयंडा तोडून चोरट्याने घरातील 11 लाख 55 हजार रुपये किंमतीचे 21 तोळे सोन्याचे दागिने लंपास केलेत. ही घटना रविवारी पहाटे उघडकीस आली. याबाबतची फिर्याद अमित अशोककुमार अडवाणी (रा. गांधीनगर) यांनी गांधीनगर पोलिस ठाण्यात दिली आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, गांधीनगर येथील कोयना कॉलनी रोडवर जितू प्रकाशलाल हिंदुजा हे आपल्या कुटुंबासह राहतात. जितू हिंदुजा आपल्या घरात झोपले होते. त्यांच्या आई, शकुंतला हिंदुजा या देवदर्शनासाठी पहाटे चारच्या सुमारास बाहेरील दरवाज्याला कुलूप लावून गेल्या असता अज्ञात चोरट्याने कडी कोयंडा उचकटून घरामध्ये प्रवेश केला. घरामधील लाकडी कपाटातून अंदाजे 20 ते 22 तोळे सोने व दुसऱ्या लाकडी कपाटातून रोख रक्कम पाच हजार रुपये घेऊन चोरट्याने पोबारा केला. पहाटे सहाच्या सुमाराला जितू हिंदुजा यांना चोरीचा प्रकार लक्षात येताच त्यांनी गांधीनगर पोलीस ठाण्याशी संपर्क साधून याची फिर्याद दिली.
याबाबत गांधीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. सहायक पोलिस निरीक्षक दीपक जाधव यांनी या चोरीची कल्पना वरिष्ठ अधिकार्यांना दिली. त्यांनी घटनास्थळी भेट दिली. श्वानही घराभोवतीच घुटमळत राहिले. पोलिस सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने अज्ञात चोरट्यांचा शोध घेत आहेत.
घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, करवीरचेे उपविभागीय पोलिस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गिरी, पोलीस उपनिरीक्षक श्रीधर सावंत यांनी भेट दिली. गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक जाधव या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.