कोल्हापूर: मनसेच्या जिल्हाध्यक्षासह शहराध्यक्षावर खंडणीचा गुन्हा, कोल्हापूरात खळबळ
कोल्हापूर | खाजगी पतसंस्थेत जबरदस्ती घुसून बँक अध्यक्षांसह उपाध्यक्षाला पट्ट्याने बेदम मारहाण केल्याप्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी मनसेच्या दोन पदाधिकाऱ्यांसह चौघांवर खंडणी तसेच ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केलाय. जिल्हाध्यक्ष राजू दिंडोर्ले, शहराध्यक्ष प्रसाद पाटील यांच्यासह समर्थ कशाळकर आणि विकास कांबळे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत लक्ष्मीपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रंकाळा येथील क्रेडिट सोसायटीच्या माध्यमातून शुभम देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कर्ज देण्याची जाहिरात करून गरजूंकडून पैसे घेतले. याबाबत जाब विचारण्यासाठी गेलेले राजू दिंडोर्ले आणि इतरांनी फिर्यादी देशमुख यांच्यासह सोसायटीचे अध्यक्ष सचिन साबळे आणि उपाध्यक्ष सुरेश पाटील यांना बेदम मारहाण केली. यावेळी कार्यालयाची तोडफोड करीत जातीवाचक शिवीगाळ देखील केली. तसेच कर्जाचे आमिष दाखवून काही लोकांकडून पैसे घेतल्याचे जबरदस्तीने लिहून घेतले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा डीव्हीआर काढून लंपास केला.
साईदर्शन जनता अर्बन को. ऑप क्रेडिट सोसायटी पदाधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना कार्यालयात कोंडून मारहाण सुरू असल्याचा प्रकार समजताच लक्ष्मीपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन देशमुख यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांनतर देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दिंडोर्ले याच्यासह चौघांना अटक केली. त्यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह दरोडा, दमदाटी, मारहाण, खंडणी उकळण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला असून .
दिंडोर्ले समर्थकांची गर्दी
दिंडोर्ले याला अटक झाल्याचे समजताच त्याच्या समर्थकांनी मंगळवारी दुपारी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याबाहेर गर्दी केली होती. पोलिसांनी गर्दीला पांगवून चौघांना न्यायालयात हजर केले. दिंडोर्ले याने गेल्याच आठवड्यात पाकिटबंद खाद्य पदार्थांच्या दर्जावरून डी मार्टमध्ये गोंधळ घातला होता. याबाबत त्याच्यावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
दरम्यान, या घटनेनंतर श्री साई दर्शन जनता अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांनीही लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या परिसरात मोठी गर्दी केली होती. दहा लाख रुपयाचे कर्ज देतो असे अमिष दाखवून साई दर्शन संस्थेतील संचालक, पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कर्ज मागणी करणाऱ्या लोकांकडून पाच हजारापासून ८५ हजार रुपये ठेवीच्या रूपाने पतसंस्थेत भरून घेतले होते. अनेक जणांना कर्ज देतो असे म्हणून गेले वर्षभर झुलवत ठेवले आहे, असे गुंतवणूकदारांनी सांगितले.