माजी आमदार सुरेश हळवणकरांच्या ‘या’ कृत्यांची सर्वत्र चर्चा | Vidhan Sabha 2024
कोल्हापूर | इचलकरंजीचे विद्यमान आमदार प्रकाश आवाडे गेली पाच वर्ष भाजप प्रवेशाची वाट पाहत होते. यासाठी त्यांनी वारंवार भाजप तसेच महायुतीला आपली ताकद दाखवून देण्यासाठी दबावतंत्राचा देखील वापर केल्याचे दिसून येत होते. अखेर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीवर दबाव वाढवून त्यांनी पुत्र राहूल आवाडेसाठी आमदारकीच्या उमेदवारीचा शब्द मिळवला आणि थेट भाजप पक्षात जाहीर प्रवेश केला. प्रकाश आवाडे यांनी पुत्र राहुल आवाडे याच्यासह बुधवारी (ता.25) केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये आपली नवी राजकीय कारकीर्द सुरू केली.
आवाडे पिता पुत्राच्या भाजप पक्षप्रवेशामुळे भाजप प्रदेश उपाध्यक्ष आणि आवाडे यांचे राजकीय विरोधक माजी आमदार सुरेश हळवणकर हे कोणती भूमिका घेणार याची चर्चा मतदारसंघात रंगली होती. त्यामुळे हळवणकरांच्या भूमिकेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. मात्र, माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी भाजपची संस्कृती पुन्हा एकदा अधोरेखित करत आवाडे पितापुत्राला स्वतःच व्यासपिठावर आणत त्यांचा पक्षप्रवेश करवून घेतला.
अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांच्या भाजप पक्ष प्रवेशाच्या चर्चेमुळे माजी आमदार सुरेश हळवणकर यांच्या राजकीय कारकीर्दीवर काय परिणाम होणार याचे अंदाज मतदार संघात लावले जात होते. आवाडेंच्या भाजप पक्षप्रवेशामुळे हळवणकरांची राजकीय कारकीर्द संपुष्ठात येणार असे देखील बोलले जात होते. मात्र राजकीय दृष्टा कट्टर विरोधक असून देखील माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी घेतलेली भुमिका सर्वांच्याच कौतुकास पात्र ठरल्याचे दिसत होते.
आगामी विधानसभा निवडणुकीत हळवणकर इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून इच्छुक होते. मात्र, अपक्ष आमदार प्रकाश आवाडे हे भाजपचे मित्रपक्ष असल्याने आणि पुत्र राहुल आवाडे यांच्या उमेदवाराची थेट घोषणा केल्यानंतर त्यांची कोंडी निर्माण झाली होती. त्यातच काल दिवसभर आवाडेंनी मुंबईत तळ ठोकून भाजपच्या वरिष्ठांकडून राहूल आवाडे यांच्या उमेदवारीचा शब्द मिळवल्याने हळवणकरांच्या अडचणीत आणखी वाढ झाल्याचे दिसून येत होते.
मात्र हळवणकर यांनी भाजप पक्षात विद्यमान अपक्ष आमदार येत असल्याचा आनंद दाखवत सर्वांची मने जिकंली. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. हळवणकर यांनीच आमदार पिता पुत्र आवाडेंना स्टेजवर आणत त्यांचे स्वागत केले. यावेळी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते आवडे पिता पुत्रांचा भाजप पक्षप्रवेश संपन्न झाला.
माजी आमदार हळवणकर यांच्या या भुमिकेमुळे कार्यक्रम स्थळी माजी आमदार सुरेश हळवणकर यांचीच जास्त चर्चा होताना दिसून येत होती. यावेळी हळवणकर यांनी स्वतःहून आवाडे पिता पुत्राना स्टेजवर आणून त्यांचा केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते पक्षप्रवेश करून घेतला. त्यामुळे पक्षातूनच हाळवणकर यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.