News

अल्पवयीन नातीवर बलात्कार प्रकरणी आजोबाला सक्तमजुरी, शेजाऱ्याला जन्मठेप; \’DNA\’ ठरला महत्त्वाचा पुरावा

छत्रपती संभाजीनगर | अल्पवयीन मुलगी घरात एकटी असल्याची संधी साधत तिच्यावर शेजाऱ्यासह आजोबाने बलात्कार केल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली होती. सदर घटनेवर न्यायालयात गुरुवारी (दि.4) सुनावणी झाली. याप्रकरणी अल्पवयीव मुलीवर बलात्कार करणाऱ्या शेजार्‍याला नैसर्गिक मृत्यूपर्यंत जन्मठेप आणि 26 हजारांचा दंड, तर नातीवर अत्याचार केल्याप्रकरणी आजोबाला दहा वर्षे सक्तमजूरी आणि 50 हजाराच्या दंडाची शिक्षा विशेष ठोठावण्यात आली. जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. वैरागडे यांच्या कोर्टात ही सुनावणी पार पडली.

याबाबत अधिक माहिती अशी, पैठण तालुक्यातील 14 वर्षीय पीडिता मे 2018 मध्ये शाळेला सुट्ट्या असल्याने घरी एकटी होती. तिचे आई-वडील आणि दोन बहिणी कामासाठी घराबाहेर गेल्या होत्या. ही संधी साधून 24 वर्षीय शेजाऱ्याने पीडितेला घरात बोलावून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर वारंवार धमकी देत आणखी चार ते पाचवेळा बलात्कार केला. पुन्हा बलात्काराचा प्रयत्न करत असताना पीडितेने विरोध केल्यावर शेजाऱ्याने मी तुझ्या घरी येईन अशी धमकी देऊन पुन्हा बलात्कार केला. पुढे गावातच राहणार्‍या पीडितेचा नातेवाईक असणाऱ्या अल्पवयीन मुलानेही तिच्यावर बलात्कार केला. या घटना घडत असतानाच मे महिन्याच्या सुट्टीत आजोबाने देखील तिला घरात एकटी असल्याची संधी साधून चाऊमिन खाऊ घालण्याच्या बहाण्याने बलात्कार केला.

पिडीतेच्या पोटात दुखू लागल्याने बलात्काराचा प्रकार उघड

वारंवार बलात्काराच्या घटनेनंतर नोव्हेंबर 2018 मध्ये पीडितेच्या अचानक पोटात दुखू लागले. तिने ही बाब आई-वडीलांना सांगितली. त्यानंतर 21 नोव्हेंबर 2018 रोजी पीडितेला एका खासगी रुग्णालयात सोनोग्राफीसाठी नेण्यात आले. तेव्हा ती सहा महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आल्याने तिच्या आईवडिलांना मोठा धक्का बसला. आई-वडीलांनी याबाबत पीडितेकडे विचारपूस केल्यावर तिने घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. यानंतर बिडकीन पोलीस ठाण्यात तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

DNA ठरला महत्त्वाचा पुरावा

या खटल्याच्या सुनावणीवेळी जिल्हा सरकारी वकील अविनाश देशपांडे यांनी 12 साक्षीदारांचे जबाब नोंदवले. विशेष म्हणजे खटल्या दरम्यान पीडितेने एका मुलाला जन्म दिला. यावेळी केलेल्या डीएनए तपासणीत शेजाऱ्याचा डीएनए जुळला. सुनावणीअंती न्यायालयाने शेजाऱ्याला भादंवी कलम 376(2) अन्वये नैसर्गिक मृत्यूपर्यंत शिक्षा, 25 हजारांच्या दंडासह कलम 506 अन्वये 1 वर्षांचा कारावास आणि 1 हजार रुपयांचा दंड ठोठावला. पीडीतेच्या आजोबाला भादंवी कलम 376 (2) (एन) नुसार 10 वर्षांचा कारावास, 25 हजार रुपयांचा दंड, अल्पवयीन बालकाला कलम 376(2) (एफ) नुसार 10 वर्षांचा कारावास आणि 25 हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एस. बी. वाघमारे, जमादार एस. जी. घुगे आणि अंमलदार सनी खरात यांनी काम पाहिले.

Back to top button