News

रंकाळा टॉवर परिसरातील डॉक्टरकडून महिला कर्मचाऱ्यांची छेड; हाणामारीत चौघे जखमी | Kolhapur Crime News

कोल्हापूर | रंकाळा टॉवर परिसरातील सिद्धी हॉस्पिटल नावाने सुरू असलेल्या आयुर्वेदिक हॉस्पिटलमधील डॉ. अतुल सोमय्या याने हॉस्पिटल मधील महिला कर्मचाऱ्यांची छेड काढल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी सुरूवातीला गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याचे सांगितले जात असून प्रकरण मिटवण्याचे देखील प्रयत्न झाल्याचे बोलले जात आहे.

अतुल सोमय्या याने छेड काढल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या महिला कर्मचारी आणि डॉक्टर मध्ये हाणामारीचा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. यामध्ये डॉ. अतुल सोमय्या, त्याची पत्नी आणि महिला कर्मचारी असे चौघेजण जखमी झालेत. त्यांना सायंकाळी उपचारासाठी सीपीआर येथे दाखलं करण्यात आले होते. या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.

रंकाळा टॉवर परिसरातील एका अपार्टमेंट मध्ये डॉ. अतुल सोमय्या याचे सिद्धी आयुर्वेदिक हॉस्पिटल आहे. डॉ. सोमय्या हा गेल्या काही महिन्यांपासून इथल्या महिला कर्मचाऱ्यासोबत छेडछाड करत होता. आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास त्याने याठिकाणी काम करणाऱ्या एका कर्मचारी महिलेची छेड काढली.

या महिला कर्मचाऱ्यानी याची माहिती आपल्या नातेवाईकांना दिली. महिला कर्मचारी तिच्या नातेवाईकांसोबत याचा जाब विचारण्यासाठी आली असता डॉ. सोमय्या, त्याची पत्नी, कर्मचारी महिला आणि तिची नातेवाईक महिला यांच्यात जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीत कर्मचारी महिला, तिची नातेवाईक महिला, डॉक्टरची पत्नी जखमी झालेत.

दरम्यान, डॉ. सोमय्या हा या हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांशी वारंवार असा प्रकार करत असल्याची तक्रार येथील महिला कर्मचाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना दिली. या घटनेची माहिती मिळताच लक्ष्मीपुरी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेची माहिती घेवून पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरा पर्यंत सुरू होते.

Back to top button