शेतकऱ्यांनी नॅनो खताचा वापर वाढवावा – प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांचे आवाहन
कोल्हापूर | पारंपरिक खत वापरामुळे होणारे नुकसान आणि नॅनो युरिया आणि नॅनो डीएपीचे फायदे पाहता जमिनीचे आरोग्य वाचवण्यासाठी आणि वाढत्या लोकसंख्येसाठी पुरेसे अन्न उत्पादन करण्यासाठी नॅनो खताचा प्रचार करणे ही काळाची गरज असून शेतकऱ्यांनी नॅनो खताचा वापर वाढवावा, असे मत प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी व्यक्त केले.
कोल्हापूर जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा सनियंत्रण सभा जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पार पडली. या सभेमध्ये रब्बी हंगामासाठी आवश्यक खते, बियाणे व कीटकनाशके पुरवठा व विक्री या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी कोल्हापूर जिल्ह्यात नॅनो खतांचा वापर वाढवा यासाठी महाराष्ट्र शासन कृषी विभाग, जिल्हा परिषद कृषी विभाग, व इफको यांच्या संयुक्त विद्यमानाने नॅनो खत जनजागृती अभियान रथाचे उद्घाटन प्रभारी जिल्हाधिकारी संयज शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रभारी जिल्हाधिकारी श्री. शिंदे म्हणाले, नॅनो युरिया आणि नॅनो डीएपीच्या वापरामुळे पिकाच्या उत्पादनामध्ये वाढ होते, खर्चात बचत होते आणि पर्यायाने शेतकऱ्याच्या एकूण उत्पादनात वाढ होते. पिकाची पौष्टिकता व गुणवत्ता सुधारते. नॅनो खते ही नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर करून बनवण्यात आली असल्याने पारंपारिक रासायनिक खतांच्या तुलनेत नॅनो खतांची कार्यक्षमता ही खूप जास्त आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नॅनो खताचा वापर वाढवावा, त्याचबरोबर नॅनो खत प्रचार रथाच्या मार्फत जिल्ह्यातील जास्तीत जास्त गावांमध्ये अधिकाधिक प्रसार व्हावा व वापर वाढावा.
इफको चे क्षेत्र अधिकारी विजय बुनगे म्हणाले, नॅनो खतांचा वापर हा फवारणी द्वारे करण्यात येतो व त्यासाठी पिकांवर नॅनो खतांची फवारणी करणे सोयीचे व्हावे, यासाठी इफकोमार्फत शेतकऱ्यांसाठी माफक दरामध्ये इफको किसान ड्रोन उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. अनुकूल परिस्थितीत नॅनो खतांची कार्यक्षमता ९० टक्के पेक्षा जास्त असते, नॅनो खतांच्या वापरामुळे रासायनिक खताच्या अतिवापरामुळे होणारे माती हवा आणि पाण्याचे प्रदूषण कमी होते.
जैव सुरक्षित आणि पर्यावरणास अनुकूल विषमुक्त शाश्वत शेतीसाठी नॅनो खते उपयुक्त आहे. वाहतूक व साठवणीसाठी सोपे व किफायतशीर आहे. इफको मार्फत नॅनो खतांच्या ५०० मिलीच्या प्रत्येक बाटलीवर शेतकऱ्यासाठी 10 हजार रुपये चा अपघात विमा संरक्षण उपलब्ध आहे, असेही ते म्हणाले. तसेच मोहीम अधिकारी यांनी जिल्ह्यामध्ये आवश्यकते प्रमाणे बियाणे व खतांचा साठा उपलब्ध असल्याचे सांगितले.
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जालिंदर पांगरे, जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकारी, सारिका वसगावकर, मोहीम अधिकारी सुशांत लव्हटे, जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक संभाजी शेणवे, करवीर पंचायत समितीचे कृषी अधिकारी सतीश देशमुख सर्व खत उत्पादक कंपनी प्रतिनिधी व समिती सदस्य यावेळी उपस्थित होते.