News

शाहूवाडी: चरण येथे तुटलेल्या विद्युत तारेच्या स्पर्शाने शेतकऱ्याचा मृत्यू; महावितरण विरोधात संतापाची लाट

कोल्हापूर | शाहूवाडी तालुक्यात महावितरण कंपनीच्या निष्काळजीपणामुळे कोपार्डे घटनेपाठोपाठ आणखी एका शेतकऱ्याचा बळी गेल्याची घटना घडली आहे. चरण येथे ऊसाच्या शेतात तुटून पडलेल्या विद्युत भारीत तारेचा स्पर्श होऊन मारुती पांडुरंग लाड (वय. ५५ ) या शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय. गुरवकी नामक शेतात शुक्रवारी (दि.२) सकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे महावितरण विरोधात परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, चरण (ता. शाहूवाडी) येथील मारुती पांडुरंग लाड हे नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी जनावरांना चारा आणण्यासाठी गेले होते. गावालगतच्या गुरवकी क्षेत्रातील ऊसाच्या शेतात ते पाला काढत असताना उभ्या उसात तुटून पडलेल्या विजवाहिनी तारेला त्यांचा स्पर्श झाला. यामध्ये विजेच्या तीव्र धक्क्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

सकाळी लवकर उठून वैराणीला गेलेले लाड उशिरापर्यंत घरी परतलेच नाही. नातेवाईकांसह शेजारीपाजारी मिळून त्यांचा अनेक ठिकाणी शोध घेतला. नेमके कोणत्या शेतात वैराणीसाठी गेलेत याची माहिती नसल्याने त्यांचा ठावठिकाणा लागत नव्हता. काही वेळाने गुरवकीतल्या ऊसाच्या शेतात त्यांचा मृतदेह आढळून आला.

दरम्यान, तुटलेल्या विजवहिनीमुळे दुर्घटना घडल्याचे समजल्यानंतर महावितरण कंपनीच्या बांबवडे कार्यालयाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी तात्काळ भेट दिली. शाहूवाडी पोलिसांनी जागेवर पंच साक्षीदारांसमक्ष पंचनामा प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह मलकापूर ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठवून दिला. शवविच्छेदानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. चरण येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

मृत लाड यांची घरची परिस्थिती खूपच हालाखीची आहे. महावितरण कंपनीने त्यांच्या कुटुंबियांना तातडीने सानुग्रह भरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मृत लाड यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, चार मुली असा परिवार आहे. मनमिळावू आणि गरीब स्वभावाचे मारुती लाड यांच्या मृत्यूने चरण परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

Back to top button