News

एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द पूर्ण केला! प्रकाश आबिटकरांना प्रथमच मंत्रिपदांची संधी, तर राष्ट्रवादीकडून हसन मुश्रीफ मंत्री

कोल्हापूर | मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी पार पडल्यानंतर आज रविवारी (15 डिसेंबर) मंत्र्यांचा शपथविधी नागपूरमध्ये पार पडणार आहे. नव्याने स्थापन होणाऱ्या मंत्रिमंडळात शिवसेनेला 11 जणांना आतापर्यंत मंत्रिपदासाठी फोन गेले आहेत. तर शिंदे यांच्या वाट्याला 12 मंत्रीपदे येण्याची शक्यता आहे. 

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दोन मंत्रीपदे निश्चित

दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात दोन मंत्रीपद निश्चित झाली आहेत. प्रकाश आबिटकरांना प्रथमच मंत्रीपदाची संधी मिळाली आहे. त्यामुळे राधानगरीचे लालदिव्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून हसन मुश्रीफ यांना मंत्रीपदाची शपथ दिली जाणार आहे. हसन मुश्रीफ यांनी कागल विधानसभा मतदारसंघातून आमदारकीचा षटकार मारला आहे. तर प्रकाश आबिटकर यांनी राधानगरी विधानसभा मतदारसंघातून हॅट्ट्रिक केली आहे. 

एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द राखला 

प्रकाश आबिटकर यांना निवडणुकीच्या प्रचारामध्ये राधानगरी विधानसभा मतदारसंघांमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना पुन्हा एकदा निवडून दिल्यास मंत्रीपदाचा बॅकलाॅग भरुन काढला जाईल, असा शब्द दिला होता. शिंदे यांनी मंत्रीपदाचा दिलेला शब्द पूर्ण केला आहे.

दरम्यान, राधानगरी विधानसभा मतदारसंघ आजपर्यंत मंत्रीपदासाठी उपेक्षित राहिला होता.  त्यामुळे आबिटकर यांना मंत्रीपदासाठी संधी दिली जावी अशी मागणी मतदारसंघासह जिल्ह्यातून सुद्धा होत होती. प्रकाश आबिटकर यांनी गेल्या अडीच वर्षांमध्ये राधानगरीमध्ये केलेला विकासकामांचा डोंगर ही त्यांची जमेची बाजू होती. त्यामुळे त्यांनी राधानगरी मतदारसंघातून 38 हजार मताधिक्याने विजय खेचून आणत आमदारकीची हॅट्रिक साधली आहे. त्यांच्या रूपाने आता राधानगरीला लाल दिवा मिळणार असून राधानगरीकरांचे स्वप्न साकार होणार आहे.

Back to top button