कोल्हापूर | कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यात आज (बुधवार) सकाळच्या सुमारास नागरिकांना भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूंकपाच्या धक्क्यांमुळे काही काळ लोकांमध्ये तणावाचे वातावरण हाेते. या भूकंपामुळे तिन्ही जिल्ह्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
सातारा जिल्ह्यातील पाटण जवळच्या गावांत ग्रामस्थांना भूकंपाचा धक्का जाणवला. सकाळी 6 वाजून 40 मिनिटांनी हा भूकंपाचा धक्का जाणवल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी यांच्या माहितीनूसार भूकंपाचा केंद्रबिंदू हा जमिनीपासून पाच किलाेमीटर खाली होता.
कोल्हापूरात 3.4 रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का नागरिकांना जाणवला. हा भूकंपाचा धक्का सकाळी 6 वाजून 45 मिनीटाच्या सुमारास जाणवल्याचे नागरिकांनी सांगितले. या भूकंपाचाही केंद्रबिंदू जमिनीपासून 5 किलाेमीटर खाली असल्याची माहिती देण्यात आली आहे.
कोल्हापूर, साताऱ्यासह सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील चांदोली अभयारण्य परिसरात देखील भूकंपाचा हा धक्का जाणवला. चांदोली अभयारण्यापासून 15 किलाेमीटर परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.