संतोष देशमुख हत्या प्रकरण: धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी, रामभाऊ गायकवाड यांची आक्रमक भूमिका
मुंबई | मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. या घटनेमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा देण्यासाठी राज्यभरात आक्रोश मोर्चे काढले जात आहेत.
मराठा नेते रामभाऊ गायकवाड यांनी या मोर्चादरम्यान आक्रमक भूमिका घेतली आहे. “जोपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत अजित पवार यांना राज्यात फिरू देऊ नका. दगडं घेऊन त्यांच्या समोर गेलं पाहिजे,” असे गायकवाड यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
राजकीय दबाव वाढतोय:
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी उचलून धरत अनेकांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. अजित पवार हे मुंडे यांचा राजीनामा का घेत नाहीत? हा सवाल आता सर्वत्र चर्चिला जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील जर या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे नाव समोर आले तर अजित पवारांना त्यांचा राजीनामा घ्यावा लागेल, असे स्पष्ट संकेत दिल्याची माहिती आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील तपास आणि त्यावरून वाढलेल्या राजकीय संघर्षाकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे. अजित पवार आणि धनंजय मुंडे या प्रकरणावर काय भूमिका मांडतात, हे येणाऱ्या दिवसांत ठरवणारे ठरेल.