संजीवन इंग्लिश मिडीयम स्कूल तर्फे पर्यावरण संवर्धनासाठी कापडी पिशव्यांचे वाटप | Environment conservation by Sanjeevan English Medium School
कोल्हापूर | श्री शाहू शिक्षण प्रसारक मंडळाच्या संजीवन इंग्लिश मिडीयम स्कूल, लिटल वंडर्स प्ले ग्रुप रंकाळा आणि शाय फाऊंडेशन तर्फे पर्यावरण संवर्धनासाठी जनजागृती मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत गंगावेश येथील ऋणमुक्तेश्वर भाजीमंडईत विक्रेते व ग्राहकांना कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.
पर्यावरण संवर्धनासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. तसेच यापुढे प्लॅस्टिक पिशव्या न वापरता कापडी पिशव्यांचा वापर करण्याचे आश्वासन विक्रेते आणि ग्राहकांनी दिले. हा उपक्रम दर दोन महिन्यातून एकदा राबविला जाणार असल्याचे यावेळी प्राचार्या व उपप्राचार्या यांनी सांगितले. या उपक्रमात 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
शालेय जीवनात, विद्यार्थांना पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन करण्याचे महत्त्व शिकवणे, त्यांना पर्यावरणीय समस्यांबाबत जागरूक करून, जबाबदार नागरिक बनण्यास प्रेरित करणे तसेच विद्यार्थ्यांच्या माध्यमातून समाजातील घटकांमध्ये जनजागृती घडवून आणणे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.
शाळेचे विश्वस्त अमर सरनाईक, संचालक युवराज पाटील, प्राचार्या अपूर्वा सरनाईक, उपप्राचार्या स्नेहा पाटील, वित्त अधिकारी ऐश्वर्या भवड, शाय फाऊंडेशनच्या संस्थापिका रेश्मा बाम, शाळेच्या विभागप्रमुख सुप्रिया किरवेकर, स्नेहा कदम, संध्या चिले तसेच इतर शिक्षक वर्ग उपस्थित होते.