दिशा सालियन मृत्यू प्रकरणी नितेश राणेंचीच होणार चौकशी; मुंबई पोलिसांनी पाठवली नोटीस | Disha Salian Case
मुंबई | दिशा सालियन मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात आदित्य ठाकरेंवर सातत्याने आरोप करणाऱ्या भाजप आमदार नितेश राणेंचीच चौकशी करण्यात येणार आहे. नितेश राणे यांना मुंबई पोलिसांकडून चौकशीसाठी हजर राहण्याबाबतची नोटीस बजावण्यात आली आहे. यामुळे दिशा सालियन मृत्यु प्रकरण पुन्हा एकदा तापणार असल्याचे दिसत आहे.
दिशा सालियन (Disha Salian Case) हिची आत्महत्या नसून हत्या आहे असा दावा नितेश राणे यांच्याकडून वारंवार करण्यात येत आहे. या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणीही नागपूर अधिवेशनात राणे यांनी केली होती. तसेच सालियन हत्येप्रकरणी आपल्याकडे पुरावे असल्याचा दावा देखील नितेश राणेंनी केला होता. त्यामुळेच आता मुंबई पोलीस आमदार नितेश राणेंची चौकशी करणार असून यामध्ये काय महत्त्वाची माहिती समोर येणार? राणे काय पुरावे सादर करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
दिशा सालियन मृत्यू प्रकरण नेमके काय आहे? Disha Salian Case
दिशा सालियान या बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांच्या मॅनेजर होत्या. 8 जून 2020 रोजी मुंबईतील घराच्या बाल्कनीमधून पडल्याने तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी आत्महत्येची नोंद केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत्यूपूर्वी दिशाने आपल्या लंडनमधील एका मैत्रिणीला फोन केला होता. आपल्या मैत्रिणीशी बोलताना दिशा थोडी चिंतेत वाटत होती.
कामाचा लोड जास्त असल्याचे तिने आपल्या मैत्रिणीला सांगितले होते. त्यानंतर थोड्याच वेळात तिचा होणारा नवरा रोहन याने दिशा ज्या खोलीत राहत होती त्या घराचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, मात्र दिशा त्या खोलीमध्ये नव्हती. त्याने खिडकीतून खाली पाहिले असता दिशा खाली पडलेली दिसली.
या प्रकरणाचा तपास पुढे सीबीआयकडे सोपवण्यात आला. दिशाचा मृत्यू झाला त्यादिवशी ती नशेत होती आणि तोल गेल्याने छतावरून खाली पडून तिचा मृत्यू झाल्याचे सीबीआय तपासात समोर आले होते. मात्र अजूनही दिशा सालियान प्रकरणात राजकीय वर्तुळातून अनेक आरोप सुरूच आहेत. दिशाच्या मृत्यूमुळे राज्यात मोठी खळबळ उडाली होती. धक्कादायक म्हणजे दिशा सालियान या आपल्या मॅनेजरच्या मृत्यूनंतर बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत याने देखील आत्महत्या केली होती.
नितेश राणे खरोखर पुरावे देणार की फक्त राजकीय वातावरण गरम करणार?
दिशा सालियान मृत्यु प्रकरणी राणे पिता-पुत्रानी सातत्याने आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप सुरू ठेवले आहेत. संधी मिळेल तिथे राणेंनी याबाबत चौकशीच्या मागणीचा पाठपुरावा सुरू ठेवला आहे. परंतु जर खरोखऱच त्यांच्याकडे पुरावे आहेत, तर त्यांनी यापूर्वीच सीबीआयकडे त्यांनी पुरावे का सादर केले नाहीत असा प्रश्नही यामुळे उपस्थित केला जातोय. त्यामुळे राणे केवळ राजकीय स्वार्थापोटी हे प्रकरण ताणून धरत असून ठाकरे गटाला टार्गेट करत असल्याचे राजकीय वर्तुळातून चर्चिल जात आहे.