गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anajli Damania) यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांचा संघर्ष ‘चव्हाट्यावर आला आता टोकाला पोहचला आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मिक कराड यांचा धनंजय मुंडेंशी संबंध असल्याचा दावा करत दमानिया यांनी मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच त्यांनी कृषी विभागातील कथित भ्रष्टाचारासंबंधी गंभीर आरोप करत पुरावेही माध्यमांसमोर सादर केले आहेत.
अंजली दमानिया यांचे आरोप
अंजली दमानिया यांनी काल (४ फेब्रुवारी) दोनवेळा पत्रकार परिषद घेत कृषी विभागातील कथित भ्रष्टाचार उघड केला. त्यांनी धनंजय मुंडे यांनी कृषी मंत्री असताना कोट्यवधींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप केला आहे. सरकारी योजनांसाठी लागणारी उत्पादने अतिशय उच्च दराने खरेदी करून सरकारी तिजोरीवर ताण आणल्याचे त्यांनी म्हटले. तसेच थेट लाभ हस्तांतर (डीबीटी) योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
धनंजय मुंडेंचा प्रतिवाद
धनंजय मुंडे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत दमानिया यांना ‘बदनामीया’ म्हणत प्रत्युत्तर दिले. “आज ५८ दिवस झाले आहेत, माझ्यावर मीडिया ट्रायल सुरू आहे. हे कोण चालवत आहे, मला माहिती नाही. डीबीटी योजनेसाठी कृषी मंत्री आणि मुख्यमंत्र्यांची परवानगी आवश्यक असते, आणि मी ती संपूर्ण प्रक्रिया पार पाडली आहे,” असे मुंडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार
अंजली दमानिया यांच्या सततच्या आरोपांमुळे धनंजय मुंडे यांनी त्यांच्याविरोधात फौजदारी अब्रूनुकसानीचा खटला मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. “अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा माझ्यावर खोटे आणि बेछूट आरोप केले आहेत. मी स्पष्ट करतो की, कृषी विभागातील खरेदी प्रक्रिया सर्व नियमानुसार आणि मुख्यमंत्री यांच्या मान्यतेनंतरच पार पडली आहे. त्यामुळे मी लवकरच त्यांच्या विरोधात अब्रूनुकसानीचा दावा करणार आहे,” असे मुंडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत स्पष्ट केले.
राजकीय वर्तुळात हा वाद चांगलाच गाजत असून, मुंडे विरुद्ध दमानिया हा संघर्ष पुढे काय वळण घेईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.