Dhananjay Munde स्पष्टच म्हणाले; “याच उत्तर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनीच द्यावे“

संतोष देशमुख हत्याप्रकरणात मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचे नाव समोर आल्याने राजकीय वर्तुळात मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे. कालच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती. तसेच, जर राजीनामा घेतला गेला नाही, तर कोर्टात जाण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

धनंजय मुंडेंचे (Dhananjay Munde) स्पष्टीकरण

या प्रकरणावर धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, “राजीनाम्यावर मी काही बोलणार नाही. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उत्तर देतील आणि त्यांनीच उत्तर द्यावे, अशी माझीही इच्छा आहे. माझ्या राजीनाम्याची अजून कोणी थेट मागणी केलेली नाही.”

संतोष देशमुख हत्येवर भाष्य करताना मुंडे म्हणाले, “देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी माझी पहिल्या दिवसापासूनच भूमिका आहे. या प्रकरणाचा फास्ट ट्रॅक कोर्टात जलद निकाल लागावा, अशी माझी मागणी आहे.”

संदीप क्षीरसागरांवर आरोप

खून प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे याच्याबाबत आमदार संदीप क्षीरसागर यांनी भाष्य केले होते. यावर प्रत्युत्तर देताना मुंडे म्हणाले, “ज्या अर्थी संदीप क्षीरसागर यांना सगळी माहिती आहे, त्याअर्थी त्यांचे आणि आरोपींचे संबंध असावेत. त्याशिवाय त्यांना इतकी माहिती मिळणे शक्य नाही.”

संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे बीड जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यावर पुढील कारवाई काय होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.