मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या 9 डिसेंबर रोजी अपहरणानंतर हत्येच्या प्रकरणाने राज्यात खळबळ उडवली आहे. देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी राज्यातील विविध जिल्ह्यांत आंदोलन सुरू आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आठ आरोपींवर मोक्का (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम) लागू करण्यात आला आहे. मात्र, खंडणीच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या वाल्मिक कराड याच्यावर मोक्का व खूनाचे 302 कलम लागू करण्यात आलेले नाही.
यावरून नाराजी व्यक्त करताना संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचे भाऊ धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) यांनी उद्या (सोमवार) सकाळी 10 वाजल्यापासून कुटुंबीयांसह आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. सोबतच त्यांनी सांगितले की, वाल्मिक कराड यांना मोक्का आणि खूनाचे 302 कलम लावले नाही तर उद्या सकाळी 10 वाजल्यापासून ( सोमवार ) आपल्या कुटुंबाचे आंदोलन सुरु होणार आहे.
या आरोपींना सोडले तर ते उद्या माझाही खून करतील. त्यापेक्षा आपण या मोबाईल टॉवरवर जाऊन स्वत:ला संपवून घेतो. मग माझ्या कुटुंबात न्याय मागणारं कोणी नसेल. माझ्या भावालाही वाटेल आपला भाऊ स्वत: संपला. अशा पद्धतीने मारला गेला नाही. याचं त्यालाही समाधान वाटेल अशा शब्दात धनंजय देशमुख यांनी आपली भूमिका मांडली आहे.
धनंजय देशमुख यांनी आरोप केला की, “आज 35 दिवस झाले तरीही आम्हाला न्याय मिळालेला नाही. सर्व यंत्रणांवर व मुख्यमंत्री साहेबांवर आम्ही विश्वास ठेवला, पण काल रात्रीपर्यंत सीडीआर आणि पुराव्यांबाबत संपूर्ण माहिती मिळणे अपेक्षित होते. पुरावे नष्ट झाल्यानंतर आम्हाला माहिती मिळणार असेल, तर आमच्या संघर्षाचा उपयोग काय?”
देशमुख यांनी सीआयडीच्या तपासावर प्रश्न उपस्थित करत सांगितले की, खंडणी व खून प्रकरणाचा संबंध तपासाच्या पहिल्याच दिवशी स्पष्ट करण्यात आला होता. मात्र, आरोपींना खुनाच्या गुन्ह्यांतून मोक्का आणि 302 कलम लागू करण्यात आलेले नाही. यामुळे उद्या आंदोलन करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही, असे धनंजय देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.