मुंबई | महाराष्ट्र भाजपकडून करण्यात आलेल्या एका ट्विट मुळे महाराष्ट्रातील राजकारणात चर्चांना उधाणं आलं आहे. भाजपकडून ट्विट करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) ‘मी पुन्हा येईन’ म्हणत असताना दिसत आहेत. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूंकप होणार काय? अशी शंका व्यक्त केली जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी दिल्ली दौरा केला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही या दौऱ्याची माहिती नव्हती. गुरुवारी पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात आले होते. त्यानंतर आज भाजपकडून ट्विट करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लढवले जाऊ लागले आहेत.
व्हिडिओमध्ये देवेंद्र फडणवीस म्हणालेत की, शेवटी एवढच सांगतो, मी पुन्हा येईन. मी पुन्हा येईन, याच निर्धारानं, याच भूमिकेत. याच ठिकाणी नवमहाराष्ट्राच्या नवनिर्मितीसाठी. गावांना जलयुक्त करण्यासाठी, शहरांचा चेहरा बदलण्यासाठी. महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी, नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी, मी पुन्हा येईन.
मी पुन्हा येईन या देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यामुळे विरोधकांनी अनेकदा त्यांची खिल्ली उडवली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीआधी मी पुन्हा येईनचा नारा दिला होता. पण, राज्यातील घडामोडींमुळे त्यांना मुख्यमंत्री होता आलं नाही. त्यानंतर एकनाथ शिंदे सरकारमध्ये त्यांनी उपमुख्यमंत्रीपद स्विकारलं होतं. त्यामुळे पुन्हा त्यांना मुख्यमंत्रीपदाने हुलकावणी दिली होती.
भाजप महाराष्ट्रने देवेंद्र फडणवीसांचा व्हिडिओ शेअर केल्याने वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. पण, भाजप नेत्यांकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. भाजप नेते प्रविण दरेकर म्हणाले की, ‘ट्विट करुन कोणी राजकीय संकेत देत नाही. एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील.’ दुसरीकडे विरोधकांकडून निशाणा साधण्यात आलाय. आमदार अपात्रतेच्या निर्णय लागू शकतो. त्यामुळेच असा प्रकारचे ट्विट करण्यात आले असं एकनाथ खडसे म्हणाले.