Tuesday, September 26, 2023
HomeCareerITI च्या विद्यार्थ्यांना परदेशात डिमांड! मिळतात मोठ्या पगाराच्या नोकऱ्या.. Demand for ITI...

ITI च्या विद्यार्थ्यांना परदेशात डिमांड! मिळतात मोठ्या पगाराच्या नोकऱ्या.. Demand for ITI students Abroad

पुणे | परदेशात नोकरी करायची तर केवळ वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी क्षेत्रातील विद्यार्थ्यांनाच संधी मिळते, असे सर्वाना वाटते. परंतु आता कौशल्य शिक्षणाच्या जोरावर आयटीआयच्या विद्यार्थ्यांनादेखील परदेशात नोकरीच्या (Demand for ITI students abroad) अनेक संधी मिळत आहेत.

जर्मनी, जपान, ऑस्ट्रेलियासह अन्य देशांत आयटीआयच्या विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे परदेशात नोकरी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपली मानसिकता तयार करावी, असे मत कौशल्य शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

परदेशात सध्या कौशल्याधिष्ठित मनुष्यबळाची कमी आहे. त्यामुळेच भारतीय विद्यार्थांनी कौशल्य शिक्षणाला महत्त्व देणे गरजेचे आहे. केरळ राज्याचा विचार करता, इथल्या प्रत्येक घरातील एक तरी व्यक्ती परदेशात नोकरी करते. हाच केरळ पॅटर्न महाराष्ट्रात अवलंबणे गरजेचे आहे.

आयटीपेक्षाही कितीतरी अधिक पॅकेज आयटीआय करणार्‍या विद्यार्थ्यांना मिळाल्याचा प्रकार राज्यात घडला आहे. राज्यातील विविध आयटीआयमध्ये शिक्षण घेणार्‍या 37 विद्यार्थ्यांची जर्मनीतील ड्युअल डिग्री साठी निवड झाली असून, त्यांना प्रशिक्षण काळात 10 लाखांचे, तर त्यानंतर 28 लाख 80 हजार रुपयांचे पॅकेज मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

औंध आयटीआयमधील आर्यन जोशी, वैजुनाथ चौगुले, ईश्वर नरवटे,अवधुत पवार या विद्यार्थ्यांची जर्मनीमध्ये ड्युअल डिग्रीसाठी निवड झाली आहे. तसेच परदेशात आयटीआयच्या विद्यार्थ्यांना विविध नोकरीच्या संधी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना जर परदेशात नोकरी करण्याची इच्छा असेल तर त्यांना औंध आयटीआयच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

परदेशात मागणी असलेल्या हेल्थ सेक्टर, बांधकाम,अ‍ॅटोमोबाईल,मॅन्युफॅक्चरिंग आदी क्षेत्रातील मनुष्यबळ तयार केल्यास भारतात मिळणार्‍या पगारापेक्षा कितीतरी अधिक पगार परदेशात मिळू शकतो.

औंध आयटीआयमध्ये जवळपास 33 ट्रेड आहेत. यातील अनेक ट्रेडच्या विद्यार्थ्यांना परदेशात मागणी आहे. संबंधित ट्रेडच्या माध्यमातून भारतापेक्षाही परदेशात विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध होत आहेत. याचा विद्यार्थ्यांनी गांभीर्याने विचार करावा.
– आर.बी.भावसार, उपसंचालक, आयटीआय, औंध 

“युरोपात सध्या आयटीआयच्या विद्यार्थ्यांना प्रचंड मागणी आहे. युरोपात सध्या तरुण वर्ग कमी आहे. तर, भारतात तो सर्वाधिक आहे. त्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांना परदेशात आवश्यक असलेले कौशल्य शिक्षण दिले, तर विद्यार्थ्यांना परदेशात नोकरीच्या मोठ्या प्रमाणात संधी मिळतील.”
– पी.एस.वाघ, आंतरराष्ट्रीय आयटीआय समुपदेशक

ITI च्या विद्यार्थ्यांना परदेशात नोकरीसाठी भारत सरकार प्रयत्नशिल

भारत सरकारच्या कौशल्य विकास मिशन अंतर्गत नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अर्थात एनएसडीसीद्वारा आयटीआयच्या विद्यार्थ्यांना परदेशात नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून एक एजन्सी नियुक्त करण्यात आली असून, एजन्सीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात येऊन त्यांना परदेशात नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

ITI च्या ‘या’ ट्रेडना परदेशात मोठी मागणी

फीटर, वेल्डर, वायरमन, कारपेंटर, प्लंबर, पेंटर, इलेक्ट्रिशयन, टर्नर, मशिनिस्ट, मोटर व्हेईकल मॅकनिक, डिझेल मॅकनिक, टूल अ‍ॅण्ड डायमेकर यांसह अन्य ट्रेडला परदेशात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्याचबरोबर बांधकाम, अ‍ॅटोमोबाईल, मॅन्युफॅक्चरिंग आदी क्षेत्रातही नोकरीच्या मोठ्या संधी आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular