मुंबई | मंत्री दीपक केसरकर यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आलं आहे. या भेटीचा फोटोच समोर आल्याने या भेटीदरम्यान कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली असावी याचे अंदाज लावण्याचे काम सुरू झाले आहे.
आज सकाळी 10 वाजता दीपक केसरकर यांनी शरद पवारांची भेट घेतली. पुष्पगुच्छ देऊन शरद पवार यांना सदिच्छा दिल्या. तसंच केसरकर यांनी शरद पवार यांच्या तब्येतीचीही विचारपूस केली. ही सदिच्छा भेट असल्याचं दीपक केसरकर यांनी सांगितलं.
शरद पवार आणि दीपक केसरकर यांच्या भेटी दरम्यान वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. शालेय आणि माध्यमिक शिक्षण पद्धतीमध्ये होत असलेल्या बदलांवर शरद पवार यांच्याशी चर्चा केल्याचं दीपक केसरकर म्हणाले. शिवाय शिक्षण क्षेत्रातील अपेक्षित सुधारणा, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या समस्या निवारण कशा करता येतील, अशा विविध विषयांवर चर्चा केल्याचं दीपक केसरकर यांनी सांगितलं.
दीपक केसरकर यांनी या भेटीचा फोटो ट्विट केला आहे. शरद पवार यांची आज सदिच्छा भेट घेतल्याच या ट्विटमध्ये केसरकर म्हणाले आहेत. या दोघांमध्ये मराठा आरक्षणाबाबत चर्चा झाल्याची सुत्रांची माहिती आहे. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे.
राजकीय वर्तुळात सध्या वेगवान घडामोडी घडत आहेत. शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते. त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. कृषीमंत्री असताना शरद पवार यांनी काय केलं? असा सवाल मोदींनी विचारला. त्यानंतर युतीमधील मंत्र्याने शरद पवार यांची भेट घेण्याला वेगळं महत्व प्राप्त झालं आहे.