News

दख्खनचा राजा जोतिबाचे 7 जुलैपासून दर्शन बंद! भाविकांसाठी महत्वाची बातमी | Shree Jyotiba

कोल्हापूर | दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या (Jyotiba Temple) मूर्तीचे पुरातत्व विभागाच्यावतीने जतन संवर्धन केले जाणार आहे. त्यानिमित्त जोतिबाच्या मूळ मूर्तीचे दर्शन रविवारी 7 जुलैपासून 11 जुलैपर्यंत बंद राहणार आहे. याबाबतची माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव सुशांत बनसोडे यांनी दिली आहे. भाविकांच्या सोयीसाठी उत्सवमूर्ती व कलश दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

Jyotiba Temple: श्री जोतिबा देवाची मूर्ती सुस्थितीत राहण्यासाठी जिल्हाधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे प्रशासक अमोल येडगे यांनी मूर्तीची पाहणी करण्यासाठी पुरातत्व विभागाला कळविले होते. त्यानुसार पुणे पुरातत्व विभागाच्या सहाय्यक संचालकासह अधिकाऱ्यांनी मूर्तीची पाहणी केली. त्याबाबतच्या अहवालात मूर्ती सुस्थितीत राहण्यासाठी मूर्तीची संवर्धन प्रक्रिया करण्याची सूचना करण्यात आली होती. 

या अहवालावर कार्यवाही करत पुरातत्व विभागाच्यावतीने दिनांक 7 ते 11 जुलै पर्यंत मूर्तीवर संवर्धन प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे या कालावधीत भाविकांना मूळ मूर्तीचे दर्शन बंद राहणार आहे. भाविकांच्या सोयीसाठी मंदिरात देवाची उत्सव मूर्ती व कलश दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. भाविकांनी कासव चौकातून कलश व उत्सवमूर्तीचे दर्शन घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन यानिमित्ताने देवस्थान समितीचे सचिव सुशांत बनसोडे यांनी केले आहे.

Back to top button