धक्कादायक! 4 वर्षात 64 जणांकडून लैंगिक शोषण, किशोरवयीन मुलीच्या दाव्याने खळबळ | Crime News
केरळमधील पथानामथिट्टा येथे एका किशोरवयीन मुलीने लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केल्यानंतर खळबळ उडाली आहे. तिच्या मते, मागील चार वर्षांत अनेकांनी तिचा गैरवापर केला. या प्रकरणात पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे, तर सहावा आरोपी आधीच तुरुंगात आहे. संबंधित मुलगी अल्पवयीन होती आणि दोन महिन्यांपूर्वी ती 18 वर्षांची झाली. शाळेतील समुपदेशन सत्रादरम्यान तिने आपल्यावर झालेल्या शोषणाचा खुलासा केला, अशी माहिती बाल कल्याण समितीने दिली.
क्रीडापटू असल्याचा उल्लेख; चौकशी सुरू
मुलगी क्रीडापटू असल्याने तिचा संपर्क विविध व्यक्तींशी आला होता. तिच्या म्हणण्यानुसार, क्रीडा शिबिरांदरम्यान आणि इतर ठिकाणी काही जणांनी तिचा गैरफायदा घेतला. यात प्रशिक्षक, सहकारी, आणि स्थानिक रहिवाशांचा समावेश असल्याचा आरोप आहे. या प्रकरणाशी संबंधित विविध ठिकाणी पॉस्को कायद्यातंर्गत गुन्हे नोंदवण्यात आले असून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.
मोबाइलमधील माहितीने वाढवल्या शंका
मुलीकडे स्वतःचा मोबाईल नसल्याने ती वडिलांचा फोन वापरत होती. या फोनमध्ये 40 संशयितांचे नंबर तिने सेव्ह केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. मुलीच्या कथनाची शहानिशा करण्यासाठी बाल कल्याण समितीने मानसोपचार तज्ञांच्या मदतीने समुपदेशन केलं. समितीच्या मते, हा मुद्दा गंभीर आहे, आणि पोलिस अधिकाऱ्यांना तपासाची माहिती सतत ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
घटना उघडकीस आल्यानंतर प्रश्नचिन्ह निर्माण
महिला आणि मुलींवरील घटनांना आळा घालण्यासाठी कठोर कायदे असूनही अशा प्रकरणांची पुनरावृत्ती चिंताजनक आहे. केरळमधील या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान आणखी काही तथ्ये समोर येण्याची शक्यता आहे.