काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी ‘या’ नेत्याचे नाव आघाडीवर
मुंबई | विधानसभा निवडणुकीत मोठा पराभव पत्करावा लागल्यानंतर राज्यातील काँग्रेसमध्ये नेतृत्वबदलाच्या घडामोडींना वेग आलाय. पराभवानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या पदाचा राजीनामा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे सादर केलाय. अद्याप हा राजीनामा स्वीकारण्यात आलेला नसला तरी काँग्रेसचा नवा प्रदेशाध्यक्ष कोण? याची चाचपणी पक्षात केली जात आहे.
प्रदेशाध्यक्षपदासाठी कोल्हापूरचे सतेज पाटील यांचे नाव सर्वात आघाडीवर आहे. सतेज पाटील हे सध्या विधान परिषदेवर आमदार आहेत. नागपुरच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान काँग्रेसचे अनेक नेते आणि आमदार नागपूर येथे उपस्थित होते. त्यांच्या बरोबर चर्चा करताना सतेज पाटील यांचे नाव समोर आले आहे. पाटील यांचे व्यक्तिमत्त्व आणि नेतृत्व गुणांसोबत , सामाजिक समीकरण देखील चर्चिले जात आहे. त्यात नाना पटोले हे ओबीसी कुणबी समाजाचे आहेत. तर बंटी पाटील यांच्या रूपाने मराठा समाजाला राज्याचे अध्यक्ष पद दिले तर एक चांगला संदेश जाईल असे, काँग्रेस आमदार बोलत आहेत.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा नामुष्कीजनक पराभव
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने ऐतिहासिक विजय मिळवत २३० जागांवर सत्ता प्रस्थापित केली आहे, तर महाविकासआघाडीला केवळ ४६ जागांवर समाधान मानावे लागले. विशेषतः काँग्रेससाठी ही निवडणूक अत्यंत नामुष्कीजनक ठरली असून, पक्षाला राज्यात फक्त १६ जागांवरच विजय मिळवता आला. यामुळे काँग्रेसच्या गोटात सध्या मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत.
नवा प्रदेशाध्यक्ष कोण?
नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये नवा प्रदेशाध्यक्ष कोण असेल याबाबत चर्चा सुरू आहे. यामध्ये सतेज पाटील यांच्यासोबतच विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, विश्वजित कदम, यशोमती ठाकूर, सुनील केदार यांची नावे देखील प्रदेशाध्यक्ष पदाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याचे सूत्रांकडून समजते. तर, नाना पटोले यांची विधिमंडळ गटनेतेपदी आणि अमित देशमुख यांची मुख्य प्रतोदपदी निवड होणार असल्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.
गटनेतेपदावरून काँग्रेस नेत्यांमध्ये मतभेद
नाना पटोले यांच्या विधिमंडळ गटनेतेपदाच्या इच्छेला काँग्रेसमधील काही वरिष्ठ नेत्यांकडून विरोध होत आहे. विजय वडेट्टीवार यांनी याबाबत सांगितले की, “गटनेतेपदाबाबत निर्णय दिल्लीतील हायकमांड घेईल. हा नाना पटोले किंवा माझा निर्णय नाही. प्रभारी नेते महाराष्ट्रात आल्यावर अंतिम निर्णय होईल.”
काँग्रेसच्या गोटात घडामोडी तीव्र
महाराष्ट्र काँग्रेसमध्ये सध्या मोठ्या राजकीय हालचाली सुरू आहेत. प्रदेशाध्यक्षपदासाठी रस्सीखेच, गटनेतेपदाच्या निवडीतील मतभेद, आणि पक्षाच्या पुनर्रचनेबाबत घेतले जाणारे निर्णय यामुळे काँग्रेसच्या आगामी वाटचालीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.