पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी ‘परंपरेचा’ पान्हा फुटलेल्या भाजपने याआधीच्या पोटनिवडणूकांमध्ये का शेण खाल्लं..? कसबा पेठ, चिंचवड पोटनिवडणूक

भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांचे निधनानंतर रिक्त झालेल्या पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघासह चिंचवड विधानसभा मतदारसंघातील आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या दोन्ही ठिकाणी पोटनिवडणूक जाहीर होताच भारतीय जनता पक्षाला नैतिकता आणि परंपरेचा पान्हा फुटला आहे.

परंपरेचे कारण सांगणाऱ्या याच भाजपाने अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणूकीत केवळ शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह शकुनीनितीने गोठवण्यासाठी, शिंदे गटाच्या खांद्यावर बंदूक ठेवून निवडणूक आयोगाव्दारे ते गोठवले. याठिकाणी जनमत पाहता नाचक्की होणार याची कल्पना आल्याने पोटनिवडणूकीसाठी निवडणूकीच्या रिंगणात भाजपा किंवा शिंदे गटाचा उमेदवार उतरवला नाही. मात्र लटकेंच्या विरोधात उमेदवार दिला नसल्याचा आव आणणाऱ्या शिंदे गट आणि भाजपाने ऋतुजा लटके यांना मतदान न करता नोटा (NOTA) ला मतदान करण्याची मोहीम राबवली. तरीही ऋतूजा लटकेंना ६५ हजार ६१८ मते मिळाली. याठिकाणी एकूण १२ हजार ७२१ मते नोटाला मिळाली. अर्थातच ही सर्व मते शिंदे गट आणि भाजपाची होती, हे जगजाहीर आहे.

पोटनिवडणूकीआधी ऋतूजा लटके यांचा पालिकेच्या नोकरीतील राजीनामा न स्विकारण्याचा प्रकार प्रशासकीय यंत्रणा हाताशी धरुन केला जात होता. त्याविरुद्ध ऋतूजा लटके कोर्टात गेल्या. जनतेची सहानुभूती लटकेंच्या बाजूने होती. या कारणास्तव राज ठाकरेंनी पत्र पाठवून ऐनवेळी परंपरेची आठवण करुन दिल्यानंतर भाजपाचे उमदेवार मुरजी पटेल यांचा भरलेला उमेदवारी अर्ज भाजपाने काढून घ्यायला लावला. परंपरेची इतकीच चाड होती, तर मुरजी पटेलचा अर्ज भरलाच कशासाठी?

पंढरपूर, कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूकवेळी परंपरेचे पालुपद कुठे गेले होते?

पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढली. त्याविरुद्ध भाजपाने उमेदवारी दिलेल्या समाधान आवताडेंचा विजय झाला. प्रचारादरम्यान तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ‘तुम्ही फक्त समाधान आवताडेंच्या नावासमोरचं कमळाचं बटण दाबून त्यांना विजयी करा मी करेक्ट कार्यक्रम करतो.’ असे दर्पोक्तीयुक्त आवाहन करत होते. तेव्हा फडणवीसांची परंपरा कुठे शेण खात होती?

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर रिक्त झाला होता. त्याजागी पोटनिवडणूक लागली तेव्हा भाजपाने काँग्रेस पक्षातून आयात केलेला निष्ठावंत उमेदवार सत्यजित कदम दिला. महाराष्ट्र भाजपचे नंबर दोनचे नेते (दोन नंबरचे नव्हे) चंद्रकांत पाटील यांनी एका सभेत बोलताना विरोधकांना चॅलेंज दिलं होतं. ‘ज्याला कुणाला वाटतं त्यांनी आज कोल्हापूर जिल्ह्यातील कुठल्याही मतदारसंघाचा राजीनामा द्यायचा, पोटनिवडणूक लावायची, निवडून नाही ना आलो ना तर सरळ राजकारण सोडून हिमालयात निघून जाईन!’ असे दर्पोक्ती मारली होती.

कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीतील सपाटून पराभव झाल्यानंतर याच चंद्रकांत पाटील यांनी निर्लज्जपणे ‘आमचे नाना कदम आले तर तुमच्या तोंडाला फेस आला, मी लढलो तर काय होईल? तसेच, मी असं म्हटलं होतो की, मी लढलो आणि हरलो तर हिमालयात जाईन. मी अजून लढलोच नाही.’ असे बिनलाजी सारवण केले.

देगलूर मतदारसंघातील पोटनिवडणूकीबाबत फडणवीस यांनी तेच केले. काँगेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवरील पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जितेश अंतापूरकर यांच्या विरोधात देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेतून आयात केलेला उमेदवार सुभाष साबणे दिला. २०१९ ला २२ हजार मतांनी पराभूत झालेले साबणे सुमारे ४१ हजार मतांनी पराभूत झाले आणि फडणवीस यांची नाचक्की झाली.

देगलूरची नाचक्की आणि कोल्हापूरात झालेले काळं तोंड याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी अंधेरी पूर्व पोटनिवडणूकीत शिंदेगटासह भाजपाने शेपूट घातली. या शेपूट घालण्यास स्ट्रॅटेजी ठरवत ‘परंपरा पाळली’ हे पालूपद लावले. यानुसार पंढरपूर – देगलूर – कोल्हापूरात कोललेली परंपरा, अंधेरी पूर्व मध्ये पाळल्याने पुण्यातील कसबा व चिंचवड मध्ये पाळण्याचे पालुपद सुरु आहे.

पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी. परंतु याच भाजपने पंढरपूर – देगलूर – कोल्हापूर मध्ये उमेदवार दिला होता. तेव्हा भाजपची राजकीय संस्कृती कुठे गेली होती? तेव्हा कुठे गेला होता तुझा धर्म रे राधासुता??