News

… तर कोरेंची त्यांच्याच मतदार संघात होऊ शकते गोची!

कोल्हापूर | विधानसभेच्या निवडणुका जसजशा जवळ येतील तसे कोल्हापूर जिल्ह्यातील राजकिय वातावरण तापू लागलं आहे. महायुतीचा घटक पक्ष असलेल्या जनसुराज्य शक्ती पक्षानं करवीर विधानसभेच्या जागेवर दावा सांगत थेट उमेदवार जाहीर केलाय. त्यामुळे शिंदे गटाचे समर्थक आणि माजी आमदार चंद्रदिप नरके यांची काय भुमिका असणार आहे याकडे सगळ्यांचे लक्ष लागून होते.

नुकतेच, माध्यमांशी बोलताना माजी आमदार चंद्रदिप नरके यांनी यावर भाष्य करताना महायुतीच्या उमेदवारीची माळ माझ्याच गळ्यात पडणार असून आमदार विनय कोरे हे महायुतीचे घटक असल्याने त्यांना मागणी करण्याचा हक्क आहे. असे म्हटले आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यासाठी शिवसेना आणि भाजप युतीला जनसुराज्य पक्षाने पाठींबा दिला होता. त्यामुळे त्यावेळच्या राजकिय घडामोडीमागे जनसुराज्य शक्तीचीही ताकद महायुतीच्या मागे होती. याच गोष्टींची आठवण करून देत कोरे यांनी जिल्ह्यातील करवीरसह पाच जागांवर दावा सांगितला आहे.

तर कोरेंची होऊ शकते गोची

शिंदे यांच्या उठावामध्ये, अंतर्गतरित्या जिल्ह्यात नरके यांच्याकडे मोठी जबाबदारी होती. ती जबादारी नरके यांनी यशस्वीपणे पार पाडली. त्यामुळे शिंदे आणि नरके यांच्यात चांगली जवळीक आहे. नरके यांनी आमदारकी नसताना देखील कोट्यवधींचा निधी मतदारसंघात खेचून आणला आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटातून नरके यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. असं असताना करवीर विधानसभा मतदार संघातून विनय कोरे यांनी जनसुराज्यचा उमेदवार जाहीर केल्यानं युतीत ठिणगी पडल्याचं बोललं जात आहे.

करवीर मध्ये महायुतीच्या विरोधात जात उमेदवार देणं कोरे यांच्यासाठी अडचणीचं ठरणार आहे. कारण पन्हाळा शाहूवाडी मध्ये जनसुराज्यची ताकद असली तरी हा मतदार संघ शिवसेनेचा पारंपरिक मतदार संघ मानला जातो. त्यामुळे कोरेंनी करवीर मतदार संघावर दावा केल्यास त्याचा उलटा परिणाम त्यांच्या स्वतच्या मतदार संघात म्हणजेच पन्हाळा शाहूवाडी मतदार संघात होण्याची जास्त शक्यता वर्तवण्यात येतेयं. त्यामुळे कोरेंच्या स्वतःच्या मतदार संघातच त्यांची गोची होण्याची शक्यता राजकीय जाणकारांकडून व्यक्त केली जातेय.

Back to top button