18 सप्टेंबर रोजी पितृपक्षात होणारं चंद्रग्रहण भारतात दिसणार? जाणून घ्या सविस्तर माहिती | Chandra Grahan
यंदाच्या वर्षीचे दुसरे चंद्रग्रहण (Chandra Grahan) हे येत्या दोन दिवसांमध्येच होणार आहे. हे चंद्रग्रहण पितृ पक्षात होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार 18 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजून 11 मिनिटांनी ग्रहण सुरू होईल आणि सकाळी 10 वाजून 17 मिनिटांनी संपेल. म्हणजे त्याचा एकूण कालावधी 4 तास 6 मिनिटे असेल. 8 वाजून 14 मिनिटांनी ग्रहण महत्त्वाच्या टप्प्यावर असेल. चंद्रग्रहण सकाळी होणार असल्याने ते भारतात दिसणार नाही. त्यामुळे त्याचा सूतक कालावधी भारतीयांसाठी वैध ठरणार नाही.
नासाच्या वेबसाइटनुसार, 18 सप्टेंबर रोजी होणारे हे खंडग्रास स्वरूपाचे चंद्रग्रहण आहे. हे चंद्रग्रहण उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, युरोप आणि आफ्रिकेतील बहुतांश देशांमध्ये दिसणार आहे. आशिया खंडातील काही ठिकाणी देखील हे ग्रहण दिसेल. हे चंद्रग्रहण यंदाच्या वर्षीचे दुसरे मोठे ग्रहण असल्याचे देखील सांगितले जात आहे. यावर्षी पितृपक्षाच्या सुरुवातीला चंद्रग्रहण आणि शेवटी सूर्यग्रहण असणार आहे. परंतु दोन्ही भारतात दिसणार नाही.
निरभ्र आकाश असलेल्या आणि प्रदूषणमुक्त ठिकाणाहून चंद्रग्रहण अतिशय चांगले दिसेल. ज्या देशांमध्ये हे चंद्रग्रहण दिसणार आहे, तेथील रहिवासी उघड्या डोळ्यांनी हे ग्रहण बघू शकतील. ग्रहण बघण्यासाठी टेलिस्कोपचा वापर केल्यास ते आणखी स्पष्ट दिसेल. याशिवाय डीएसएलआर कॅमेऱ्यानेही ग्रहणाचा चंद्र कॅप्चर करता येईल.
भारतात धार्मिक दृष्टिकोनातून ग्रहणाची घटना शुभ मानली जात नाही. ग्रहण काळात काही विशेष गोष्टींची काळजी घेतली तर कुटुंबाच्या आणि व्यक्तीच्या जीवनावर वाईट परिणाम होत नाही असे मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, चंद्रग्रहणादरम्यान घराबाहेर पडू नये. विशेषत: गरोदर महिलांनी ग्रहणकाळात विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. जर तुम्ही धार्मिक गोष्टींवर विश्वास ठेवत असाल तर तुम्ही त्याचे पालन करू शकता. मात्र, वैज्ञानिक दृष्टिकोन असलेल्या खगोलप्रेमींसाठी ग्रहणाचा दिवस विशेष असतो.