चंदगडमध्ये शिवाजी पाटलांनी बाजी मारलीच! Chandgad Vidhan Sabha Election Result 2024
कोल्हापूर | चंदगड विधानसभा मतदारसंघात (Chandgad Vidhan Sabha Election Result 2024) अखेर भाजपचे बंडखोर उमेदवार शिवाजी पाटील यांनी बाजी मारली असून ते विधानसभेत आमदार म्हणून पोहचले आहेत. याठिकाणी पाचही तुल्यबळ उमेदवार निवडणूक रिंगणात आल्याने निवडणूक नेमकी कोण जिंकणार, याबाबत मोठी उत्सुकता होती.
महायुतीकडून राजेश पाटील, महाविकास आघाडीकडून नंदा बाभूळकर, भाजपचे बंडखोर शिवाजी पाटील, काँग्रेसचे बंडखोर अप्पी पाटील यांच्यासह जनसुराज्यचे मानसिंग खोराटेही रिंगणात होते. राजेश पाटील व नंदा बाभूळकर यांनी मोठ्या सभा घेत वातावरण तापवले होते. तर शिवाजी पाटील यांनी मात्र एकाही मोठ्या नेत्याला न बोलविता स्वतःच सभा घेत मतदारांवर आपली छाप सोडली होती.
शिवाजी पाटील यांना सुरूवातीपासूनच वाढीव मताधिक्य मिळत गेले. यामुळे पाटील यांच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला. सुरुवातीपासून मिळालेली मतांची आघाडी शेवटपर्यंत कमी झाली नाही. शिवाजी पाटील हे भाजपचे बंडखोर म्हणून अपक्षरित्या रिंगणात आले असले तरी प्रत्यक्षात देवेंद्र फडणवीस यांचे ते विश्वासू असल्याने विजयानंतर ते भाजपसोबतच राहणार हे नक्की आहे.
गडहिंग्लज व चंदगड तालुक्यातील भाजपची मोठी फळी त्यांच्यासोबत काम करत होती. साहजिकच भाजपचेही बळ त्यांना या निमित्ताने लाभले. मनसेच्या नागेश चौगुले, शिंदे गटाच्या अनिरुद्ध रेडेकर यांनी त्यांना पाठिंबा देत सहकार्य केले.