Chandgad Vidhan Sabha 2024 : चंदगडमध्ये भाजप आणि अजित पवार गटात पुन्हा वादाची ठिणगी, उमेदवारींच्या घोषणेने वाद उफाळला
कोल्हापूर | कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड विधानसभा मतदारसंघात महायुतीतील बेबनाव चव्हाट्यावर आलाय. चंदगड विधानसभा मतदार संघात महायुतीच्या अजित पवार गटानं विद्यमान आमदार राजेश पाटील यांची उमेदवारी यापूर्वीच जाहीर केलीय. असं असताना चंदगडमधील भाजप नेते शिवाजी पाटील यांनी मेळावा घेत उमेदवारीसाठी शड्डू ठोकलाय.
विशेष म्हणजे शिवाजी पाटील यांनी घेतलेल्या मेळाव्याला गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी उपस्थिती लावलीय. त्याचबरोबर त्यांनी चंदगड विधानसभा मतदार संघातून भाजपचे उमेदवार म्हणून शिवाजी पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा देखील केलीय. यामुळं महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडल्याचं पहायला मिळतय.
चंदगडमध्ये शिवाजी पाटील यांनी आयोजित केलेल्या मेळाव्यात बोलताना गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, गेल्या निवडणुकीमध्ये शिवाजी पाटील काही मतांनी पराभूत झाले. मात्र, यावेळी त्यांना मोठ्या मतांनी निवडून आणायचं आहे. दुसरीकडे, या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे राजेश पाटील हे विद्यमान आमदार आहेत. त्यांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.
याबाबत बोलताना, आमदार राजेश पाटील म्हणाले की महायुती जर अबाधित ठेवायचे असेल आणि लोकसभेला ज्या पद्धतीने झालं ते विधानसभेला व्हायचं नसेल तर त्या पक्षातील नेत्यांनी इच्छुकांना समजावून सांगावे. त्याचबरोबर अजितदादा या सगळ्याची योग्य ती दखल घेतील, असं म्हणत हसन मुश्रीफ यांनीही आपली नाराजी व्यक्त केली आहे.
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या वक्तव्यावर बोलताना, पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, अजितदादांनी या ठिकाणी राजेश पाटील यांच्या नावाची घोषणा केली आहे. गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात येऊन शिवाजी पाटील यांच्या नावाची घोषणा करणे योग्य नाही.
एकूणच या सर्व प्रकारामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक मतदार संघात महायुतीच्या घटक पक्षांमधील धुसफूस पुन्हा एकदा समोर आली आहे. यापूर्वी कोल्हापूर उत्तर तसेच करवीर विधानसभा मतदार संघात देखील महायुतीत उमेदवारीवरून धुसफुस आणि ठिणगी पडत असल्याचं पहायला मिळालं आहे.