आक्षेपार्ह विधानाबाबत धनंजय महाडिक यांच्यावर गुन्हा दाखल #DhananjayMahadik

कोल्हापूर | भाजप खासदार धनंजय महाडिक (DhananjayMahadik) यांना जाहीरपणे ‘लाडक्या बहिणीं’ना दम देणं चांगलच भोवलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून धनंजय महाडिक यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोल्हापूर येथील महात्मा फुले युवक मंडळ फुलेवाडी, पाचवा स्टॉप येथील राजकीय प्रचाराच्या जाहीर सभेत धनंजय महाडिक यांनी महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या जाहीर भाषणात भारतीय न्यायसंहिता-2023 कलम 179 अन्वये आदर्श आचारसंहितेचे उल्लघंन केल्याचे निदर्शनास आल्यानंतर निवडणूक आयोगाकडून त्यांना नोटीस पाठवण्यात आली होती. दरम्यान, याबाबतचा तत्काळ खुलासा सादर करावा, असे धनंजय महडिक यांना सांगण्यात आले होते.

याबाबत धनंजय महाडिक यांनी खुलासा सादर केला. परंतु सादर केलेला खुलासा अमान्य करीत धनंजय महडिक यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी भरारी पथकातील संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार भारतीय न्याय संहिता बी एन एन एस २०२३ अंतर्गत १७१ (२) (a) अंतर्गत दि. १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.२३ वा जुना राजवाडा कोल्हापूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धनंजय महाडिकांचे आक्षेपार्ह विधान

‘लाडकी बहीण योजनेचे पैसे घेणाऱ्या महिला जर काँग्रेसच्या रॅलीत, सभेत दिसल्या तर त्यांचे फोटो काढून आम्हाला द्या आम्ही त्यांची व्यवस्था करतो. जर इथं काँग्रेसची निघाली आणि त्यामध्ये आपल्या योजनेचे 1500 रुपये घेतात त्या महिला दिसल्या, तर त्यांचे फोटो काढून घ्या, नावे लिहून घ्या. घ्यायचे आपल्या शासनाचे आणि गुण त्यांचे गायचे असे चालणार नाही.’, असं वक्तव्य करत धनंजय महाडिक यांनी जाहीरपणे महिलांना दमदाटी केल्याचे पाहायला मिळाले होते.

दरम्यान महाडिक यांच्या या वक्तव्यावर सर्वच स्तरातून टिका होऊ लागल्यानंतर त्यांनी ‘माझ्या वक्तव्याने कुठल्याही माता भगिनींचे मन दुखावले असेल तर मी त्यांची बिनशर्त माफी मागतो. माझे वक्तव्य कुठल्याही माता भगिनींचा अपमान कऱण्यासाठी मुळीच नव्हते. असे स्पष्टीकरण देत माफी मागितली होती.