करिअरचा नवा मार्ग – ऑनलाईन मीडियातील संधी | Career In Online Media

मुंबई | सध्या ऑनलाईनचा जमाना आहे. (Career In Online Media) अगदी कॅश भरण्यापासून ते अभ्यासापर्यंतच्या सर्व गोष्टी आता ऑनलाईन होत आहेत. बँकेचे व्यवहार असो की तिकिटचे बुकिंग असो, एका क्लिकवर होणाऱ्या व्यवहाराची आवड सध्या लोकांमध्ये निर्माण होत चालली आहे. त्यामुळे ऑनलाईन मीडियात अनेक संधी उपलब्ध आहेत.

ऑनलाईन पब्लिशिंग:-
इंटरनेटचा शोध लागण्याआधी प्रकाशन व्यवसाय हा फक्त पुस्तके, मासिके व वर्तमानपत्र यांच्यापुरता मर्यादित होता. पण आता ऑनलाईन प्रकाशन ही संकल्पना लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर रुजली आहे. ई-पेपर, ई-बुक्स, ई-न्यूजलेटर्स, ई-मॅगझिन्स इत्यादी तयार करणाऱ्या व्यावसायिकांना खूप मागणी आहे. याशिवाय कंटेंट प्रोव्हाईडर, ग्राफिक डिझाईनर, टेक्निशियन्स आणि ऑनलाईन एस.ई.ओ. मार्केटिंग एक्सपर्ट यांची खूप आवश्यकता असते. लोकांनाही आजकाल छापिल पुस्तके विकत घेण्यापेक्षा ई-बुक वाचणे जास्त सोयीस्कर वाटते. ऑनलाईन मीडिया हे वेगाने पसरत जाणारे क्षेत्र आहे. त्याच्या विकासाचा वेग पाहता येणाऱ्या काळात ऑनलाईन मीडियाला खूप महत्त्वाचे स्थान प्राप्त होणार आहे. त्यामुळे या क्षेत्रातील संधी वेळीच ओळखून व त्यातील कौशल्य आत्मसात करून जगातील सर्वात प्रभावी प्रसारमाध्यम ठरू पाहणाऱ्या या क्षेत्रात करियरचा विचार करण्यास काही हरकत नाही.

वेब डिझायनिंग:-
कुठल्याही नवीन मीडियाकडे लोकांनी आकर्षित होण्यासाठी त्या मीडियाकडे स्वतःचे असे काहीतरी वैशिष्ट्य असणे गरजेचे आहे. वेब डिझाइनर होण्यासाठी कुठल्याही क्षेत्रातील पदवीसहित एच.टी.एम.एल., जावा स्क्रिप्ट, फ्लॅश, फ्लॅश अ‍ॅक्शन स्क्रिप्ट यांसारख्या तांत्रिक भाषा येणे आवश्यक आहे. याशिवाय इंटरनेट व डिझाईनिंगचे चांगले ज्ञान असणे आवश्यक आहे.

मल्टिमीडिया अँड अ‍ॅनिमेशन:-
भारतात टेलिव्हिजन आणि इंटरनेट यांच्या विस्तारासहित अ‍ॅनिमेशन व स्पेशल एफेक्टस् या कामांशी संबंधित व्यावसायिकांची खूप गरज आहे. या क्षेत्रातील कुशल लोक टेक्स्ट, इमेज, ग्राफिक, ऑडिओ, व्हीडिओ आणि अ‍ॅनिमेशन यांच्याआधारे उत्पादन तयार करतात. पाश्‍चात्य देशातील कंपन्याही भारतातील फ्रीलान्सर्सची मदत घेऊन आपले उत्पादन तयार करतात. याची डिलिव्हरीही इंटरनेटद्वारेच होते.