स्वयंरोजगाराच्या संधी मिळवून देणारी शाखा! होमसायन्स मध्ये करिअरच्या संधी | Career In Home Science

मुंबई | बऱ्याच मुलींचा गैरसमज असतो की होमसायन्स म्हणजे फक्त स्वयंपाक करायला शिकवतात आणि केवळ या गैरसमजातून या शाखेचा विचार केला जात नाही. खरं तर विविध जीवनकौशल्ये शिकवून मुलींना उत्तम रोजगाराच्या आणि स्वयंरोजगाराच्या संधी मिळवून देणारी ही शाखा आहे. दहावीनंतर पाच वर्षांत बीएस्सी होमसायन्स अशी पदवी मिळवून देणारा हा कोर्स आहे. विशेष म्हणजे तो मराठी आणि इंग्रजी या दोन्ही माध्यमातून उपलब्ध आहे. केमिस्ट्री, बायॉलॉजी, सायकॉलॉजी या विषयांचाही अभ्यास या शाखेत करण्याची संधी मिळते. बारावीनंतर पुढच्या तीन वर्षांसाठी पदवीसाठी खालीलपैकी कोणताही कोर्स मुली निवडू शकतात.सर्व संदर्भ लक्षात घेता होम सायन्स या शाखेतून विविध प्रकारची जीवन कौशल्ये विकसित होतात आणि रोजगार व स्वयंरोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतात.

टेक्सटाइल व ॲपरल डिझाईन
या कोर्स मध्ये मुलींना टेक्सटाइल डिझायनिंग, टेक्सटाइल सायन्स, ॲपरल डिझायनिंग, वस्त्रनिर्मिती व दर्जा नियंत्रण असे अनेक विषय शिकवले जातात. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर मुलींना ड्रेस डिझायनिंग, कॉस्चुम डिझायनिंग इ. क्षेत्रात नोकरी किंवा स्वयंरोजगाराच्या संधी मिळतातच, शिवाय स्क्रीन प्रिंटिंग, बुटीक, बॅग्ज/पर्सेस बनवणे अशा विविध क्षेत्रात स्वयंरोजगाराच्या संधी मिळू शकतात.

मनुष्यबळ विकास
बालमानसशास्त्रापासून उद्योजकतेपर्यंत अनेक विषयांचा अभ्यास करण्याची संधी मुलींना या कोर्समध्ये मिळते. तो पूर्ण केल्यानंतर प्री प्रायमरी शाळेत शिक्षिका, समुपदेशक, प्रशिक्षक अशा रोजगाराच्या संधी मिळू शकतात, तसेच पाळणाघर, नर्सरी स्कूल, छंद वर्ग, शिबिरे, टॉय आणि बुक लायब्ररी अशा विविध स्वयंरोजगाराच्या संधी पण मिळू शकतात.   

फॅमिली रिसोर्स मॅनेजमेंट 
गृहसजावटीची आवड आणि दृष्टी असणाऱ्यांसाठी हा उत्तम अभ्यासक्रम आहे. हॉस्पिटॅलिटी क्षेत्रासाठी आवश्यक कौशल्ये यात शिकविली जातात .

न्यूट्रीशन व डाएटिटिक्स 
आहाराबद्दल अत्यंत जागरूक होत चाललेल्या समाजात या कोर्सची खूपच उपयुक्तता आहे. संतुलित आहार व आरोग्य यासंबंधी अनेक विषय या कोर्समध्ये शिकवले जातात. बारावीपर्यंत सायन्स शाखेतून शिकलेल्या विद्यार्थिनींनाही या कोर्समधून पदवी शिक्षणाचा पर्याय उपलब्ध आहे. हा कोर्स केल्यानंतर डाएटिशियन, ॲप्लाइड न्यूट्रिशन , फूड इंडस्ट्री, हॉस्पिटल्स व नर्सिंग होम्स अशा विविध क्षेत्रात स्वयंरोजगाराच्या व रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत.

फूड सायन्स व दर्जा नियंत्रण – अन्नप्रक्रिया उद्योगाशी संबंधित विविध विषयांचा अभ्यास या कोर्समध्ये विद्यार्थिनी करतात. हा कोर्स केल्यानंतर अन्नप्रक्रिया उद्योग व त्यासंबंधीच्या प्रयोगशाळा यामध्ये रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी विद्यार्थिनींना मिळू शकतात.