इलेक्ट्रिकल इंजिनिअर बनायचे आहे का? जाणून घ्या करिअरच्या संधी | Career In Electrical Engineering

मुंबई | इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग असे उच्चारताच डोळ्यासमोर येतात ते म्हणजे, इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रिक मशीन, इलेकट्रोमॅग्नेटिझम या सारखे शब्द. (Career In Electrical Engineering) पण इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ही शाखा एवढ्यापुरतीच मर्यादित नाही, काळाबरोबर या शाखेची यशस्वीवाटचाल व विकास अखंड चालू आहे. या सारख्या अनेक कारणांमुळे व आपल्या इलेक्ट्रिसिटीवर अधिकाधिक अवलंबून असण्यामुळे, इलेक्ट्रिसिटी ही तर आपल्या बदलत्या जीवनशैलीचा एक अविभाज्य घटक बनली आहे. म्हणूनच या क्षेत्रात भविष्यात कोणत्या संधी आहेत, हे आपण जाणून घेऊया…

विद्युत अभियांत्रिकी म्हणजेच इलेक्ट्रिकल इंजिनिरिंग ही आभियांत्रिकीतील मूलभूत (कोअर) शाखा असल्यामुळे या शाखेचे आकर्षण, उत्सुकता व अभिमान हा सर्व काळात सारखाच आहे. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ही सर्वातमोठी व सर्व क्षेत्रांवर प्रभाव टाकणारी प्रगतिशील अभियांत्रिकीची शाखा आहे. असे म्हंटले जाते कि, अर्थव्यवस्थेचा विकास हा विज्ञान व तंत्रज्ञानाशी निगडित असतो. हीच काळाची गरज ओळखून विद्युत अभियांत्रिकी (इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग) ही फक्त पारंपारिक शाखा न राहता नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाची जोड असलेली, अखंड विकसित होत जाणारी अभियांत्रिकीच्या प्रमुख शाखांमधील एक शाखा आहे.

वाढती लोकसंख्या, उद्योगधंदे, आधुनिक उपकरणांचा वापर व उत्पादन, कारखान्यातील यंत्रे व मशिनरी, शेती उद्योग, वैद्यकीय व्यवसाय, ऑटोमोबाईल, स्पेस अँप्लिकेशन्स, रोबोटिक्स, ऑटोमेशन या व इतरही सर्व क्षेत्रात तंत्रज्ञान विकसित करण्याची मोठी संधी विद्युत अभियंत्यांना आहे.

भविष्यातील संधी
भारत सरकारच्या नियोजना नुसार, 2030 हे इलेक्ट्रिक वाहनांचे युग असेल. प्रदूषणापासून मुक्तता, पर्यावरण रक्षण, देशांतर्गंत सुरक्षा व उत्पादन क्षमतेला चालना यामुळे इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती तसेच खाजगी वाहन व पब्लिक वाहतूक क्षेत्रांतील 30 टक्के बाजारपेठ काबिज करणे हे भारताचे उद्दीष्ठ आहे. यामुळे इलेक्ट्रिक वाहने, हायब्रीड वेहिकल्स अशा क्षेत्रात तंत्रज्ञान विकसित करण्याची व संशोधन करण्याची संधी विद्युत अभियंत्यांना उपलब्ध आहे.

अपारंपारिक ऊर्जास्रोत (रिन्यूएबल एनर्जी) निर्मिती, प्रचार व प्रसार ह्यांचा कल्पकतेने वापर करून देशाला आर्थिक संपन्न बनविण्यात इलेक्ट्रिक अभियंत्यांचा मोलाचा सहभाग असेल. 2030 पर्यंत पारंपारीक ऊर्जा स्रोतांना (नॉन रिन्यूएबल एनर्जी) शाश्वत अशा अपारंपारिक ऊर्जा (रिन्यूएबल एनर्जी) स्रोतांनी बदललेले असेल, यात इलेक्ट्रिक अभियंत्यांचा वाट लक्षणीय राहील. वेगाने चार्ज होणाऱ्या, दीर्घकाळ टिकणाऱ्या, अधिक क्षमतेच्या बॅटरीची निर्मिती व संशोधन हे विद्युत अभियंत्यांसमोर कायमच आव्हान असेल. संगणक प्रणालीचा वाढत वापर, स्वयंचलित वाहने, स्वयंचलित उद्योग प्रणाली व उत्पादन यंत्रणा, रोबोटिक्स, अवकाशयानाचे कक्षेतील नियंत्रण ह्या सारख्या गोष्टीनं साठी विद्युत अभियांत्रिकीतील कंट्रोल अभियंत्यांना प्रचंड वाव आहे.

रोजगाराच्या संधी
विद्युत अभियंत्यांना स्वयंरोजगाराबरोबर शासकीय, निमशासकीय, खाजगी अशा अनेक क्षेत्रांत रोजगाराच्या मुबलक संधी उपलब्ध. उदाहरणादाखल सांगायचेच झाले तर सुझलॉन इंडिया, टाटा पॉवर,  सिमेन्स, क्रॉम्प्टन ग्रीव्हस, नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन इंडिया, पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन, अदानी पॉवर, एबीबी, ऑइल अँड नॅचरल  गॅस एजन्सी (ओएनजीसी), विद्युत मंडळे, कोल पॉवर ऑफ इंडिया, भारत हेवी इलेक्ट्रिक व्हेइकल्स लिमिटेड, इरिगेशन डिपार्टमेंट, टेलिफोन एक्सचेंज, वाहन निर्मिती उद्योग व इतर अनेक सॉफ्टवेअर कंपन्या. 

अभ्यास व संशोधन 
भारत व भारत बाहेर अमेरिका , कॅनडा , इंग्लंड ,ऑस्ट्रलिया , जर्मनी सारख्या नामांकित युनिव्हर्सिटीमध्ये पुढील शिक्षण, संशोधन तसेच करियरच्या संधी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. या सर्वांचा मतितार्थ म्हणजे मल्टीडिसिप्लिनरी तंत्रज्ञान आत्मसात करणे व त्याचे अवलंबन करणे ही काळाची गरज ओळखणे गरजेचे आहे. विद्युत अभियांत्रिकीचे महत्व व गरज कायम असणार आहे. भविष्यात अभ्यासासाठी व संशोधनासाठी विद्युत अभियंत्यांना बराच वाव आहे. म्हणूनच विद्युतभियांत्रिकी शाखेची निवड गुणवान विद्यार्थी नक्कीच करतील.