बी.फार्म नंतर करिअरच्या संधी! जाणून घ्या ड्रग इन्स्पेक्टर विषयी सर्व माहीती | Career After B.Pharma

मुंबई | बी. फार्म पदवी शिक्षणानंतर करिअरच्या अनेक संधी आहेत. (Career After B.Pharma) औषधनिर्माण, संशोधन, विक्री आणि त्या अनुषंगाने येणारी उपक्षेत्रे हे फार्मसीचे कार्यक्षेत्र आहे. त्यातील करिअरसाठी विविध प्रकारचे उच्च शिक्षण, नोकरीच्या संधी भारतात आणि भारताबाहेर उपलब्ध आहेत. त्यापैकी एक चांगली संधी म्हणजे ड्रग इन्स्पेक्टर.

पात्रता:-
फार्मसीची बी.फार्म पदवी अथवा फार्मास्युटिकल केमिस्ट्री/मेडिसिन विषयातील पदवीसह क्लिनिकल फार्माकोलॉजी किंवा मायक्रोबायोलॉजीमधील स्पेशलायझेशन असावे. अठरा महिने ते तीन वर्षांचा औषध उत्पादन क्षेत्रातील उत्पादन, टेस्टिंग, गुणवत्ता अशा कामाचा अनुभव असावा. (अठरा महिने औषध उत्पादन आणि अठरा महिने औषध परीक्षण/टेस्टिंगमधील अनुभव अपेक्षित.) काही आस्थापनांमध्ये अनुभवाची अंशत- सूट असू शकते. वयोमर्यादा २१ ते ३० वर्षे आहे. 

निवड परीक्षेचे स्वरूप :-
पहिला टप्पा लेखी परीक्षा प्रकाराचा आहे. यामध्ये दोन पेपर्स असतात. एक मुख्य विषयासंदर्भात (फार्मसी) तर दुसरा सामान्य ज्ञान/विज्ञान असा असतो. लेखी परीक्षा बहुपर्यायी ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची असते. या परीक्षेत साधारणपणे फार्मसी, फार्माकोलॉजी, मेडिकल केमिस्ट्री, फॉरेंसिक, फिजिओलॉजी, क्लिनिकल फार्मसी, हॉस्पिटल फार्मसी, औषध निर्मिती, हेल्थ एज्युकेशन आदी विषयांवर प्रश्न विचारले जाऊ शकतात. परीक्षेतील अभ्यासक्रम आस्थापनानुसार बदलू शकतो. (काही ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग असते.) त्यानंतर शारीरिक तपासणी/मेडिकल टेस्ट असते. मुलाखतीनंतर उमेदवाराची निवड होते.

UPSC:-
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या ड्रग इन्स्पेक्टरसाठीच्या परीक्षेत फार्मसी हा पहिला पेपर असतो. त्यासाठी दोन तासांचा कालावधी असतो. त्यामध्ये १०० प्रश्न आणि २०० गुण असे पेपरचे स्वरूप असते. दुसरा पेपर सामान्य ज्ञानाचा असतो. एक तासाच्या अवधीत ५० गुणांसाठी ५० प्रश्न सोडवायचे असतात. एकूण २५० गुणांची ही परीक्षा असते. लेखी परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर मुलाखतीसाठी बोलावले जाते.

कामाचे स्वरूप:-
औषधांची गुणवत्ता, त्यांचा दर्जा, लोकांचे आरोग्य धोक्यात येणार नाही याची खात्री, योग्यतेची पारदर्शकता, स्वच्छता/हायजिनविषयक कायदेशीर मानके यांचे पालन अशी कामे ड्रग इन्स्पेक्टरच्या कार्यकक्षेत येतात. अशा कामांच्या अनुषंगाने ड्रग इन्स्पेक्टर अन्न, औषधे आणि सौंदर्यप्रसाधनांच्या निर्माण प्रयोगशाळा, निर्मितीच्या कंपन्या, साठवण आणि विक्रीमध्ये गुंतलेल्या सर्व व्यवसायांची तसेच विक्री केंद्रांवर जाऊन गुणवत्ता तपासणीचे काम करत असतात.

संधी:-
शासकीय विभाग तसेच खासगी आस्थापनांमध्ये अशी पदे उपलब्ध असतात. औषधांसाठीच्या प्रयोगशाळा, फार्मसी संदर्भातील औषध निर्माण करणाऱ्या इंडस्ट्री तसेच रुग्णालयांमध्ये या कामासाठी संधी असते.