पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांच्या बसला भीषण अपघात, 5 जण जागीच ठार, 8 जण गंभीर जखमी | Bus Accident
मुंबई | पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांच्या बसचा भीषण अपघात झाला असून यामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यु झाला आहे. तर या अपघातात 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर (Mumbai-Pune Expressway Highway) डोंबिवलीवरून (Dombivli) पंढरपूरला (Pandharpur) जाणाऱ्या ट्रॅव्हल्सला अपघात (Accident of Travels) झाला आहे.
अपघाताची माहिती मिळताच मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आलं. सर्व जखमींना एमजीएम रूग्णालय आणि पनवेलच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सर्व जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत.
राज्यभरातून अनेक वारकरी आषाढीसाठी पंढरपुराच्या दिशेनं रवाना होत आहेत. डोंबिवलीवरुन निघालेल्या अशाच एका वारकऱ्यांच्या ट्रॅव्हल्सला भीषण अपघात झाला आहे. पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी निघालेल्या या ट्रॅव्हल्समधून एकूण 54 वारकरी प्रवास करत होते. पण वाटेतच त्यांच्यावर काळानं घाला घातला आहे. रात्री एक वाजण्याच्या सुमारास मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरुन ट्रॅव्हल्स पंढरपूरच्या दिशेनं जात असताना हा भीषण अपघात झाला आहे.
वारकऱ्यांच्या ट्रॅव्हल्ससमोर एक ट्रॅक्टर जात होता. यावेळी ट्रॅव्हल्स चालकाचा ताबा सुटल्याने पुढे जाणाऱ्या ट्रॅक्टरला ट्रॅव्हल्सची मागून जोरात धडक बसली. त्यामुळे ट्रॅव्हल्स अनियंत्रित होऊन थेट 30 ते 40 फूटाच्या खड्ड्यात जाऊन कोसळली. यावेळी ट्रॅव्हल्समध्ये 54 वारकरी होते. यातील 5 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. तर 20 ते 30 प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे.
दरम्यान, एक्सप्रेसवेवर ट्रॅक्टरला बंदी असतानाही ट्रॅक्टर एक्सप्रेसवेवर आलाच कसा? पोलीस यंत्रणा कार्यरत नाही का? असा सवाल सध्या उपस्थित होत आहे.
Bus Accident: वर्ध्यावरून पंढरपूरला जाणाऱ्या बसचा अपघात!
आषाढी एकादशी निमित्त वर्ध्यावरून पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या एसटी बसला अपघात झाला आहे. यवतमाळच्या पुसद येथे हा अपघात झाला असून वारकऱ्यांना मध्येच थांबण्याची वेळ आली. रात्रीच्या सुमारास पुसद नजीक मद्यधुंद अवस्थेत असलेल्या बस चालकाने माहुर फाट्याजवळील सुधाकर नाईक यांच्या पुतळ्याजवळ एका डिव्हायडरला बसची धडक दिल्याने हा अपघात झाला. या बस मधून 45 वारकरी प्रवास करीत होते. या अपघातामध्ये एक वयोवृद्ध महिला व एका मुलास गंभीर स्वरूपाची दुखापत झाली आहे. दुखापत झालेल्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. बसमधील कंडक्टर तसेच ड्रायव्हर दोघांनीही मद्यप्राशन केल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती.