कोल्हापूर: बुलेट चोरट्यास पाठलाग करून ठोकल्या बेड्या; दोन बुलेट हस्तगत
कोल्हापूर | जुना राजवाडा पोलिसांनी शनिवारी पाठलाग करून मंगळवारपेठ व राजारामपुरी येथील चौथ्या गल्लीतून बुलेट चोरणार्यास अटक केली आहे. मयुरेश अमर पाटील (वय 24, रा. शिवाजी पार्क) असे त्याचे नाव आहे. वाहन चोरीच्या दोन गुन्ह्यांची त्याने कबुली दिली असून न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात सार्वजनिक तसेच अपार्टमेंट परिसरात पार्किंग केलेल्या दुचाकींची चोरी होत असल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दुचाकी वाहन चोरट्यांचा छडा लावण्याचे आदेश शहर व जिल्ह्यातील प्रभारी पोलिस अधिकार्यांना दिलेत. त्यानुसार शहरासह जिल्ह्यात सर्वत्र शोधमोहीम राबविली जात आहे.
शहरातील देवकर पाणंद परिसरात एक तरुण विनानंबर प्लेट बुलेटवरून वावरत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संजीव झाडे व गुन्हे प्रगटीकरण पथकाचे प्रमुख संतोष गळवे यांना मिळाली होती. माहिती मिळाल्यानंतर पथकातील कॉन्स्टेबल प्रशांत घोलप, नीलेश नाझरे, सागर डोंगरे, प्रवीण सावंत यांनी बुलेटवरून फिरणाऱ्या संशयिताला वाहनासह देवकर पाणंद पेट्रोलपंपाजवळ ताब्यात घेतले. त्याच्याकडे कागदपत्रांबाबत चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.
त्यामुळे सदर संशयितास पोलिसी खाक्या दाखविताच त्याने तीन दिवसांपूर्वी मंगळवारपेठ येथून बुलेटची चोरी केल्याचे कबूल केले. पाठोपाठ राजारामपुरी येथील चौथ्या गल्लीतून दुसरी बुलेट चोरी केल्याचेही त्याने सांगितले. संशयिताकडून 3 लाख 5 हजार रुपये किमतीच्या दोन बुलेट हस्तगत करण्यात आल्या आहेत. पोलिस निरीक्षक संजीव झाडे यांनी याबाबत माहिती दिली असून संशयिताकडून दुचाकी चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली आहे.