Dhanajay Munde यांचा पाय आणखी खोलात? आणखी एक प्रकरण अंगलट, कोर्टाकडून नोटीस; 20 फेब्रुवारीला सुनावणी

राष्ट्रवादी काँग्रेसचे (Ajit Pawar गट) नेते आणि मंत्री धनंजय मुंडे (Dhanajay Munde) यांच्यावरील संकट दिवसेंदिवस वाढत आहे. परळी विधानसभा मतदारसंघातून आमदारकीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांनी शपथपत्रात महत्त्वाची माहिती लपवल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. याचिकेच्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मुंडे आणि इतर उमेदवारांना नोटीस बजावण्याचा आदेश दिला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २० फेब्रुवारी रोजी होणार आहे.

काय लपवले मुंडेंनी? Dhananjay Munde

याचिकाकर्ते राजाभाऊ श्रीराम फड यांनी न्यायालयात सादर केलेल्या तक्रारीनुसार, धनंजय मुंडे यांनी शपथपत्रात दोन अपत्यांचा उल्लेख केला असला, तरी पत्नी करुणा मुंडे यांचा उल्लेख टाळला आहे. तसेच, करुणा मुंडे यांच्या नावावर असलेली वाहने, फ्लॅट, विमा पॉलिसी, सोन्याचे दागिने, बँकेत असलेले जॉइंट खाते, इतर मालमत्ता आणि न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणे यांची कोणतीही माहिती शपथपत्रात दिली नाही. त्यामुळे त्यांनी जाणीवपूर्वक ही माहिती लपवल्याचा आरोप करण्यात आला आहे.

२०१९ आणि २०२४ मधील फरक

२०१९ च्या निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी आपल्या शपथपत्रात पत्नी राजश्री मुंडे आणि तीन अपत्यांचा (वैष्णवी, जान्हवी, आदीश्री) उल्लेख केला होता. मात्र, २०२४ च्या शपथपत्रात पाच अपत्यांचा (शिवानी, सिशिव, वैष्णवी, जान्हवी, आदीश्री) उल्लेख आहे. यावरून त्यांनी पूर्वी दोन अपत्यांची माहिती लपवली होती, असा आरोप विरोधकांनी केला आहे.

मुंडेंचे मंत्रीपद धोक्यात?

संतोष देशमुख हत्या प्रकरण, कृषी विभागातील भ्रष्टाचार तसेच या सर्व आरोपांमुळे धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदावर टांगती तलवार आहे. विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. आता आगामी सुनावणीत न्यायालय काय निर्णय देते आणि मुंडे या आरोपांवर काय उत्तर देतात, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.