‘भाजप’ गवत नेमकं आहे तरी काय? ‘काँग्रेस’ गवता नंतर शेतकऱ्यांना ‘या’ गवताची धास्ती | जाणून घ्या सविस्तर | BJP Grass

मुंबई | अनेक वर्षांपूर्वी शेतकऱ्यांच्या बांधावर काँग्रेस गवत फोफावत होते. मात्र, कालांतराने काँग्रेस गवत नामशेष होत चालले आहे. असं असतानाच आता महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात भाजप गवताची मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचं समोर आलं आहे. शेतीच्या बांधावर भाजप गवत (BJP Grass) फोफावल्याने शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो.

भाजप गवताला चिबुक काटा या नावानेही ओळखतात. हे एक विदेशी गवत आहे. मात्र, ते भारतात कसे आले याविषयी संशोधनाची गरज असल्याचे, अभ्यासक सोमिनाथ घोळवे यांनी म्हटलं आहे. भाजप गवत काय आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना काय त्रास सहन करावा लागतो याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया सोमनाथ घोळवे यांच्याकडूनच..

गेल्या 15 दिवसांपूर्वी अहमदनगर, शेवगाव, पाथर्डी, शिरूर कासार, बीड, केज, जामखेड, आष्टी असा दौरा झाला..! या दौऱ्यात सर्वत्र एक बाब निदर्शनास आली ती म्हणजे शेतीच्या बांधावरच नाही, तर शेतात देखील भाजप (चिमुक काटा) गवताचा जास्त प्रमाणात झालेला फैलाव….(पहा फोटो). या संदर्भात अनेक शेतकऱ्यांशी चर्चा देखील केली… सर्वजण या गवताला “भाजप गवत” याच नावाने ओळखत असल्याचे दिसून आले. या गवताला “भाजप गवत” का म्हणतात हा प्रश्न मला पडला ? या संदर्भात बऱ्याच शेतकऱ्यांशी बोलणे झाले. शेतकऱ्यांकडून “आम्ही भाजप गवत असेच म्हणतो, याच नावाने ओळखतो” असे उत्तर मिळाले. एका अर्थाने या विदेशी गवताला शेतकऱ्यांनी नवीन ओळख दिली असल्याचे दिसून आले. भाजप गवताची ओळख ही अलीकडची नाही तर गेल्या तीन-चार दशकांपासून आहे. पण अलीकडे मोठ्या प्रमाणावर बांधावर , शेतात आणि मोकळ्या जागेवर वाढ झाल्याने हे गवत सर्वत्र चर्चेला येते.

या गवताला प्रत्येक कांड्यावर बारीक अचकुणीदार काटे असल्याने शेतकरी “चिमुक काटा” असे म्हणत होते. पण ही ओळख अलीकडे पूर्णपुणे मिटलेली आहे… काही वयस्कर शेतकऱ्यांशी चर्चा केल्यावर चिमुक काटा गवत असे म्हणतात असे ऐकण्यास मिळाले… अलीकडील सर्व तरुण शेतकरी या गवताला “भाजप गवत” असेच म्हणतात…तरुण शेतकऱ्यांना या गवताचे मूळ आणि उपयोग असे काहीही माहीत नसल्याचे दिसून आले. मात्र काँग्रेस गवत कमी होऊन हे भाजप गवत वाढले आहे, ऐवढेच गावांगावात शेतकऱ्यांकडून सांगण्यात येते.

या गवताचा वाढीचा वेग वाढला असल्याने शेतकऱ्यांना मोठा त्रास वाढला आहे.

अनेक शेतकरी तणनाशक फवारणी करून या गवताला मारण्याचा प्रयत्न करत आहेत..मात्र हे गवत मरत नाही. हे तितकेच खरे आहे… हे गवताचे पूर्ण आयुष्य झाल्यानंतर (वाळल्यावर) पेटवून देण्याशिवाय शेतकऱ्यांकडे काहीच पर्याय राहत नाही. गवताला आग लावून जाळले तरी पाऊस पडला की नव्याने उगवून येते. तसेच वेगाने वाढ देखील होते.

अतिवृष्टीने गावोगावच्या मोकळ्या जागेवर भाजप गवताचा फैलाव वाढला आहे. मी १९९० ते २००८ पर्यंत या गवताला ऊसाच्या शेतीत आणि बांधावर पाहत होतो. पण अलीकडे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये याचा फैलाव मोठ्या प्रमाणावर झालेला आहे…विशेषतः बागायती परिसरात या गवताची वाढ वेगाने होताना दिसून येते.

“अल्टरनेनथेरा चेसिलिज” या शास्त्रीय नावाने परदेशात या गवताला ओळखले जाते. हे गवत मुळात परदेशी आहे. सुमारे 40 /45 वर्षपूर्वी अमेरिकेतून गव्हाच्या माध्यमातून गाजर गवताचे बी आले… नंतर ते मोठ्या प्रमाणावर फोफावले….त्या गवतास “काँग्रेस गवत” असे म्हटले गेले. त्याच प्रमाणे भाजप गवताची वाढ आणि प्रसार देशातील भाजप पक्षाच्या बरोबरीने असल्याने “भाजप गवत” अशी ओळख या शेतकऱ्यांनी दिली असावी, असे काही जुन्या जाणत्या शेतकऱ्यांचे मत आहे.

भाजप गवताचे वैशिष्ट्ये असे की, या चालू वर्षात या गवताचे उदंड पीक आले आहे…

कोवळे असताना खूपच हिरवेगार पालवी असणारे आणि लुसलुशीत दिसते… जनावरे देखील आवडीने-चवीने खातात… पण हे गवत जसे परिपक्व अवस्थेकडे जाते. त्यावेळी जनावरांच्या नाकाला काटे टोचू लागतात. त्यामुळे परिपक्व झालेले हे गवत जनावरे खात नाहीत. गवत कोवळे असताना जनावरांच्या चाऱ्यामुळे शेतकऱ्यांना आकर्षक वाटते. पण परिपक्व झाले की त्रास होतो. या गवतामध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट, खनिज याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे दूध उत्पादनात वाढ होत असल्याचे मत काही शेतकऱ्यांनी सांगितले. या गवतावर सखोल संशोधन होणे आवश्यक आहे.. नाहीतर भविष्यात शेतकऱ्यांना खूप त्रास देणारे गवत म्हणून उदयाला येईल असा अंदाज शेतकरी सांगतात.