मोठी बातमी! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात Bird Flu चा प्रादुर्भाव; प्रशासनाकडून Alert Zone ची घोषणा

बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव सूरू झाला की प्रशासन अलर्ट मोडवर येते. महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यात सध्या बर्ड फ्लूचा (Bird Flu) प्रादुर्भाव आढळून आल्याने प्रशासन कामाला लागले आहे. लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरात मागील काही दिवसांपासून कावळ्यांच्या अचानक मृत्यूची मालिका पाहायला मिळत होती. या घटनेमागील रहस्य सध्या उलगडले असून, कावळ्यांच्या मृत्यूला बर्ड फ्ल्यूचा संसर्ग कारणीभूत असल्याचे भोपाळ वैद्यकीय प्रयोगशाळेच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.

प्रशासनाने जाहीर केले अलर्ट झोन – Bird Flu

कावळ्यांच्या मृत्यूचे प्रकार आढळलेल्या उदगीर शहरातील 10 किलोमीटरचा परिसर ‘अलर्ट झोन’ म्हणून घोषित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी महात्मा गांधी उद्यान, हुतात्मा स्मारक, नगरपरिषद वाचनालय, आणि पाण्याच्या टाकीच्या आसपासचा परिसर अलर्ट झोनमध्ये समाविष्ट केला आहे.

या क्षेत्रात नागरिकांच्या हालचालींवर तसेच पक्षी आणि प्राण्यांच्या वाहतुकीवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. कुक्कुटपालन करणाऱ्या पक्ष्यांचे सर्वेक्षण आणि वैद्यकीय नमुन्यांचे संकलन करून त्यांची प्रयोगशाळेत चाचणी केली जाणार आहे.

कावळ्यांच्या मृत्यूचे विचित्र स्वरूप

उदगीर शहरातील तीन ठिकाणी, महात्मा गांधी उद्यान, हुतात्मा स्मारक परिसर, आणि पोलीस ठाण्याच्या आवारात कावळ्यांचे मृतदेह आढळून आले. या कावळ्यांच्या मृत्यूची पद्धतही लक्षवेधी ठरली. मृत्यूपूर्वी कावळ्यांची मान वाकडी होत असल्याचे आणि झाडांवरून अचानक जमिनीवर कोसळल्याचे निदर्शनास आले. आतापर्यंत एकूण 150 हून अधिक कावळ्यांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

प्रतिबंधात्मक उपाययोजना

या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. बाधित क्षेत्रातील खाजगी वाहने बाहेर पार्क करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

पशुवैद्यकीय विभाग सतर्क

कावळ्यांच्या मृत्यूची माहिती मिळताच पशुवैद्यकीय विभागाने मृतदेह गोळा करून त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवले. आता बर्ड फ्ल्यूचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासन पूर्ण क्षमतेने कामाला लागले आहे.

नागरिकांनी काय करावे?

  • पक्ष्यांशी थेट संपर्क टाळा.
  • संशयास्पद घटनांची माहिती प्रशासनाला द्या.
  • सरकारी आदेशांचे पालन करा.