मुंबई | बँकिंग आणि फायनान्स सेक्टर मधील उमेदवारांसाठी येणारा काळ अत्यंत चांगला असणार आहे. कारण लवकरच ‘बीएफएसआय’ म्हणजे बँकिंग, फायनॅन्शिअल सर्व्हिसेस आणि इन्शुरन्स (BFSI) सेक्टर मध्ये जवळपास 50 हजाराहून अधिक जागांची भरती होणार आहे.
मागील काळात म्हणजे विशेषकरून कोविड नंतर बँकिंग, फायनॅन्शिअल सर्व्हिसेस आणि इन्शुरन्स सेक्टर मध्ये काहीशी नोकऱ्यामध्ये कपात झाल्याचे दिसत होते. मंदी सदृश काळानंतर आता आर्थिक घडी पुन्हा सुरळीत होत असल्याने या सेक्टरमध्ये नवीन नोकऱ्या दिल्या जात आहेत. त्यामुळेच ही मेगाभरती होणार आहे.
क्रेडिट कार्ड सेल, पर्सनल फायनान्स, रिटेल इन्शुरन्स विक्री, वैयक्तिक वित्त, बँकिंगमधील विमा, वित्तीय सेवा आणि विमा यामध्ये वाढ झाल्याने बीएफएसआय क्षेत्रात सध्या तेजी आहे. म्हणून या क्षेत्रात येत्या काळात भरघोस नोकऱ्या निर्माण होणार आहेत. यासंदर्भात ‘टीमलीज’ ने एक अहवाल जाहीर केला आहे. ज्यामध्ये 2023 च्या अखेरीस जवळपास 50 हजार नोकऱ्या निर्माण होणार असल्याचे म्हटले आहे.
कोरोनानंतर लोकांच्या मनात भीती होती. त्यामुळे खर्च करण्याच्यी मानसिकताच कमी झाली होती. पण आता लोक खर्च करत आहेत. शिवाय सणासुदीचे दिवस जवळ आल्याने लोकांचा खरेदीकडे कल वाढला आहे. परिणामी अर्थव्यवस्थेला चालना मिळाल्याने 2023 मध्ये साधारण दिवाळीच्या आधी बँकिंग, फायनॅन्शिअल सर्व्हिसेस आणि इन्शुरन्स सेक्टर मध्ये हजारो नोकऱ्या उपलब्ध होणार आहे.
‘येत्या पाच ते सहा महिन्यांमध्ये किंग, फायनॅन्शिअल सर्व्हिसेस आणि इन्शुरन्स सेक्टर मध्ये मोठ्या प्रमाणात भरती होणार आहे. याची सुरूवात झाली असून, गेल्या दोन महिन्यांमध्ये अंदाजे 25 हजार लोकांना नोकऱ्या मिळाल्या आहेत तर येत्या काळात अजून 25 हजार लोकांना या क्षेत्रात रोजगार मिळेल.’ असे टीमलीजचे उपाध्यक्ष कृष्णेंदू चॅटर्जी यांनी सांगितले आहे.
बीएफएसआय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या पगारामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 7 ते 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ‘टीमलीज’च्या अहवालानुसार, ऑन-दि-फीट रोलसाठी दिल्ली, मुंबई आणि बंगळुरूमध्ये 20 ते 22 हजार रुपये पगार दिला जात आहे. तर कोलकातामध्ये 16 ते 18 हजार रुपये आणि चेन्नईमध्ये 18 ते 20 हजार रुपये पगार दिला जात आहे.
बीएएसआय क्षेत्रात तात्पुरत्या कर्मचाऱ्यांची मागणी नेहमीच मोठी असते. त्यातही अहमदाबाद, पुणे, मुंबई, बंगळुरू, कोलकाता, कोची, विशाखापट्टणम, मदुराई, लखनऊ, चंदिगढ, अमृतसर, भोपाळ आणि रायपूर या शहरांमध्ये नोकरीच्या मोठ्या संधी असतात. विशेषकरून ई-कॉमर्स, रिटेल, कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल्स आणि स्मार्टफोन या क्षेत्रांत चलती असते. क्रेडिट कार्ड, पर्सनल लोन आणि इन्शुरन्स प्रॉडक्टची मागणी देखील वाढलेली असते.