Santosh Deshmukh हत्या प्रकरण: पोलिसांनी फिल्डिंग लावली पण धनंजय देशमुखांचा गनिमी कावा, गावकऱ्यांसह शोले स्टाईल आंदोलन, वाल्मिक कराडवर मोक्काची मागणी

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येप्रकरणाला महिना उलटून गेला आहे. या हत्येच्या घटनेतील आठ आरोपींवर मोक्का (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्यात आली असली तरी, मास्टरमाईंड असल्याचा आरोप असलेल्या वाल्मिक कराडला (Walmik Karad) मोक्कातून वगळण्यात आल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.

ग्रामस्थांचा शोले स्टाईल आंदोलन

मस्साजोगमधील ग्रामस्थांनी वाल्मिक कराडवरही मोक्का लावण्याची मागणी करत आक्रमक भूमिका घेतली आहे. आज सकाळपासून पाण्याच्या टाकीवर चढून “शोले स्टाईल” आंदोलन सुरू करण्यात आले. या आंदोलनात संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुखही सहभागी आहेत.

ग्रामस्थ आज मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करणार होते, मात्र मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असल्यामुळे त्यांनी जवळच्या पाण्याच्या टाकीवर चढून आपला रोष व्यक्त केला आहे.

मनोज जरांगे पाटील यांचा हस्तक्षेप

धनंजय देशमुख यांच्या आंदोलनाची माहिती मिळताच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मस्साजोग गावात दाखल झाले. त्यांनी फोनद्वारे धनंजय देशमुख यांच्याशी संवाद साधून आंदोलन थांबवण्याची विनंती केली.

“तुम्हाला काही झाले तर आम्ही यांना सोडणार नाही. तुमच्या कुटुंबाला आधाराची गरज आहे. प्लीज खाली या. सगळा समाज तुमच्या पाठीशी आहे, तुम्ही खचून जाऊ नका,” असे भावनिक आवाहन मनोज जरांगे यांनी केले. या संवादादरम्यान दोघांच्याही डोळ्यात अश्रू तरळल्याचे दिसून आले.

प्रशासनाची चर्चा सुरू

अद्याप धनंजय देशमुख आंदोलनावर ठाम असून, पाण्याच्या टाकीवरून खाली उतरण्यास तयार नाहीत. या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिडके यांनी धनंजय देशमुख यांच्याशी चर्चा सुरू केली आहे.