मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी झिरो बॅलन्सवर उघडता येणार बँक खाते; केडीसीसी बँकेचा निर्णय | Mukhyamantri Ladki Bahin Yojana
कोल्हापूर | कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी (Mukhyamantri Ladki Bahin Yojana) झिरो बॅलन्सवर खाती उघडून देण्यास सुरुवात केली आहे. खास या योजनेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील माता भगिनींसाठी ही अभिनव योजना राबविण्याचा निर्णय बँकेने घेतल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी जी. एम. शिंदे यांनी दिली आहे.
याबाबत बँकेने प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, महाराष्ट्र राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने नवीन खाते केवळ शून्य बाकीवर उघडण्याची अभिनव योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
केडीसीसी बँक शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबवत असून त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची रक्कम जमा होण्यासाठी जिल्हा बँकेतील कोणत्याही शाखेत सध्या चालू असलेल्या बचत ठेव खात्यामध्ये देखील सरकारच्या योजनेतील रक्कम जमा करून लाभ घेता येईल. अथवा नवीन खाते झिरो बॅलन्सवर उघडता येईल.
बँकेच्या खातेदारांना प्रधानमंत्री जीवन ज्योती आणि जीवन सुरक्षा विमा योजनेचा देखील लाभ मिळेल. जिल्हा बँकेच्या 191 शाखा कार्यरत असून कार्यालयीन वेळेत महिला भगिनींना योजनेचा लाभ मिळण्यासाठी झिरो बॅलन्सवर खाते उघडण्याची सुविधा दिली जात आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अशा प्रकारची सुविधा उपलब्ध करून देणारी कोल्हापुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक राज्यातील पहिली बँक ठरल्याचेही शिंदे यांनी पत्रकातून सांगितले आहे.