बालिंगा पुल वाहतूकीसाठी बंद; वाहनधारकांतून संताप
रात्री नऊ वाजल्यापासून लहान वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद केली जाणार आहे. तर चार चाकी वाहनांची वाहतूक काही वेळात रोखली जाणार आहे.
आर.बी.शिंदे, उपअभियंता, राष्ट्रीय महामार्ग उपविभाग क्र.2
कोल्हापूर | कोल्हापूर गगनबावडा मार्गावरील बालिंगा पुलाच्या मच्छिंद्रीपेक्षा दीड ते दोन फुटाने पाणीपातळी वाढली आहे. यामुळे पुलाच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव वाहतूक बंद करण्यात आल्याचे प्रसिद्धीपत्रक राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपअभियंता आर. बी. शिंदे यांनी प्रसिद्धीस दिले आहे. आज रात्री 9 वाजल्यापासून सर्व वाहतूक पूर्णपणे बंद केली जाणार आहे. तत्पुर्वी राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता मुधाळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बालिंगा पुलावरील वाहतूक आज बंद करणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं.
मागील वर्षी देखील राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुलाच्या सुरक्षेच्या कारणास्तव पुलावरून होणारी सर्व वाहतूक बंद केली होती. त्यावेळी देखील महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या कारभाराचा सावळा गोंधळ दाखवून दिला होता. वाहतूक बंद करणार, नाही करणार असे करता करता वाहनधारकांना वेठीस धरले होते. आज देखील याचा पुन्हा प्रत्यय आल्याने वाहनधारकांतून संताप व्यक्त होत आहे.