बजाजची जगातील पहिली CNG बाईक लाँच; किंमत लाखाच्या आत, देईल 300 किमी मायलेज.. जाणून घ्या फिचर्स | Bajaj Freedom 125cc
पुणे | बजाज ऑटोने आज जगातील पहिली सीएनजी-चलित मोटरसायकल (Bajaj Freedom 125cc) लाँच करून जगभरातील ऑटो इंडस्ट्रीत मोठा धमाका केला. \’बजाज फ्रीडम 125\’ या नावाने ही बाईक लाँच करण्यात आली आहे. बजाज फ्रीडम बाईक CNG आणि पेट्रोल या दोन्ही इंधनावर चालू शकते. रायडरला कोणत्या गाडी चालवायची आहे, त्यानुसार एक बटण दाबून ती CNG आणि पेट्रोलमध्ये स्विच करता येते.
बजाज फ्रीडम 125 CNG ची किंमत 95,000 ते Rs 1.10 लाख (एक्स-शोरूम) दरम्यान आहे. बाइकचे बुकिंग सुरू झाले असून डिलिव्हरी प्रथम महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांमध्ये केली जाणार आहे. उर्वरित राज्यांमध्ये टप्प्याटप्प्याने ही बाइक उपलब्ध करून दिली जाणार आहे.
फ्रीडम 125 मध्ये 2 किलोची सीएनजी टाकी आणि 2 लिटरची पेट्रोल टाकी देण्यात आली आहे. बाईकच्या 11 हून अधिक सुरक्षा चाचण्या करण्यात आल्या आहेत. 10 टन वजनाने भरलेल्या ट्रकखाली आल्यानंतरही फ्रीडम 125 च्या टाकीचा स्फोट झालेला नाही. त्यामुळे ही बाईक पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा करण्यात आला आहे. बाईक फुल टँकमध्ये (पेट्रोल+सीएनजी) 300 किमीपर्यंतचे अंतर कापते.
बजाज ऑटोने या बाईक बद्दल माहिती देताना सांगितले आहे की, फ्रीडम 125ला सर्वात लांब सीट (785MM) देण्यात आली आहे. फ्रंट फ्युअल टँक त्यात बरोबर बसते. सीएनजी टँक या सीट खाली आहे. यामध्ये हिरव्या रंगाने सीएनजी तर नारिंगी रंगाने पेट्रोल दाखविले आहे. बाईकमध्ये रोबस्ट ट्रेलिस फ्रेम देण्यात आली आहे. त्यामुळे ही बाईक वजनाला हलकी आणि मजबूत झाल्याचा कंपनीचा दावा आहे.
बजाज फ्रीडम सीएनजी बाईक तीन प्रकारात उपलब्ध आहे. यात सात ड्युअल टोन कलर पर्यायही देण्यात आले आहेत. यामध्ये कॅरेबियन ब्लू, इबोनी ब्लॅक ग्रे, प्यूटर ग्रे ब्लॅक, रेसिंड रेड, सायबर व्हाईट, प्यूटर ग्रे येलो, इबोनी ब्लॅक रेड रंगाचा यामध्ये समावेश आहे.